Bhiwandi Farmers Protest pudhari photo
ठाणे

Bhiwandi Farmers Protest : भिवंडीत आम्ही भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा तहसीलवर धडक मोर्चा

ठाणे जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा घोषित करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदतीपासून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ आम्ही भूमिपूत्र शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर सोमवारी सकाळी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये भिवंडी परिसरासह विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ऐन खरीप हंगामाच्या सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला असून भातपीके करपली गेल्याने शासनाने ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा घोषित करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

दरम्यान राज्यातील ३६ पैकी ३३ जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत तसेच इतर सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, ठाणे जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश न झाल्याने भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्यांतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना अद्याप अपेक्षित शासकीय मदत मिळालेली नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली.

तसेच जनावरांच्या चाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट उभे राहणार असल्याचे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे आता नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करणेही शक्य नसल्याने शासनाने पंचनाम्यांच्या प्रक्रियेची अट न ठेवता थेट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील यांनी केली.

तर शासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी दीपक पाटील, प्रकाश लसणे, नरेंद्र पाटील, जनार्दन पाटील, सोनिबाई भावर, संजय चव्हाण, अमोल भोईर, राजू शेलार, महेश देसले, रामदास केणे, लहू घोडविंदे, राजाराम भोईर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT