Bhiwandi Encroachment Pudhari
ठाणे

Bhiwandi Encroachment: भिवंडीत अतिक्रमणावर पालिकेची कारवाई; अनेकांचे संसार उघड्यावर

भूखंडावरील अतिक्रमण केलेल्या चाळी भुईसपाट

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी शहरातील टेमघर परिसरातील महानगरपालिकेने आरक्षित केलेल्या भूखंडावरील अतिक्रमण करून बनवण्यात आलेल्या चाळींवर पालिकेने कारवाई केली आहे. यावेळी येथील चाळी भूईसपाट करण्यात आल्या आहेत.

पालिका प्रभाग समिती अतिक्रमण पथकाच्या मदतीने जेसीबी चालवून येथील अतिक्रमण भुईसपाट केले आहे. टेमघर येथील सर्व्हे क्रमांक 19 यामधील गुरुचरण जागा पालिकेच्या विकास आराखड्यात शाळा व शाळेचे मैदान यासाठी आरक्षित करण्यात आली होती.

या जागेवर मागील कित्येक वर्षांपासून स्थानिकांनी अतिक्रमण करीत चाळी बांधल्या होत्या. त्यासंबंधी नगररचना विभागाकडून आरक्षित जागेबाबत मोजमाप झाल्यानंतर संबंधितांना नोटीस बजावून मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 100 घरे तोडण्यात आली असल्याची माहिती प्रभाग समिती क्रमांक 2 चे सहाय्यक आयुक्त विनोद मनोरे यांनी दिली आहे.

येथील नागरिकांकडून या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ही जागा आमच्या कुटुंबाच्या मालकीची आहे. पालिकेने आम्हाला नोटीस दिली, पण आमची जमीन मोजणी केल्यानंतर कारवाई करायची होती; परंतु पालिकेने जमीन मोजणी करताना आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही, अशी तक्रार विल्सन ठाकूर यांनी केली आहे. पालिकेने ही कारवाई करताना आपल्याला अंधारात ठेवले.

जमीन मोजणी करताना कोणतीही नोटीस बजावण्यात आली नव्हती. आम्ही दहा वर्षांपासून या ठिकाणी आमच्या जागेत राहात होतो. मग पालिकेने आम्हाला का नाही थांबवले, आजच अचानक ही जागा गुरुचरण असल्याचे कसे लक्षात आले, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

जबरदस्तीने कारवाई केल्याचा आरोप

स्थानिक लोकप्रतिनिधी गुरुचरण जागा म्हणून आमची जागा ताब्यात घेण्यासाठी ही जबरदस्तीने कारवाई केल्याचा आरोप कुंता पाटील यांनी केला आहे. या कारवाईमुळे मागील दहा वर्षांपासून येथे वास्तव्य करणाऱ्या अनेकांचे संसार उघड्यावर आले असून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT