dangerous buildings AI photo
ठाणे

Bhiwandi Dangerous Buildings: धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करा; भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर महापौरांचे निर्देश

या बैठकीत शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी: शहरातील धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्‍याचे निर्देश भिवंडी महानगरपालिका महापौर नारायण चौधरी यांनी दिले. शहरातील गंगाराम वाडी येथील कोहिनुर अपार्टमेंट इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भिवंडी महानगरपालिकेत महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक शनिवारी पार पाडली. या बैठकीत शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेण्यात आला.

यावेळी उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी संदीप गाडेकर, सहायक आयुक्त नितीन पाटील, फैसल तातली, पाचही प्रभाग समितीचे सहायक आयुक्त, अग्निशमन अधिकारी नितीन चव्हाण, सुरक्षा विभाग प्रमुख सुदाम जाधव, वाहन विभाग प्रमुख, आस्थापन विभाग प्रमुख कल्याणी चन्ने, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख शाकीब खर्बे आदी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात सी-१ प्रवर्गातील २३८ आणि सी-२ए प्रवर्गातील ८३६ अशा एकूण १,०७४ धोकादायक इमारती आहेत. महापौरांनी या सर्व इमारतींचा वीज व पाणीपुरवठा बंद करून त्या रिकाम्या करण्याचे निर्देश दिले.

धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना गरज भासल्यास महापालिकेच्या इमारतींमध्ये पाच ते सहा दिवसांसाठी तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. नोटीस देताना जागामालक भोगवटादारांना पंचनाम्याची प्रत देण्याचे निर्देशही महापौर नारायण चौधरी यांनी दिले आहेत.

अधिकाऱ्यांनी पाहणी करावी

धोकादायक इमारतींमध्ये परवानगीशिवाय दुरुस्ती सुरू नाही ना, याची प्रभाग अधिकाऱ्यांनी नियमित तसेच रात्रीच्या वेळी पाहणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रत्येक प्रभागात मोठे डम्पर आणि जेसीबी उपलब्ध ठेवण्याचे, अग्निशमन वाहनांची नियमित देखभाल करण्याचे तसेच वैद्यकीय विभागासाठी रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी एक रुग्णवाहिका भाड्याने उपलब्ध करून देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT