भिवंडी : अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभर सुरू झालेल्या धडक कारवाईचे पडसाद आता भिवंडीतही उमटू लागले आहेत. भिवंडी महानगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शहरातील अस्वच्छता, अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्री आस्थापनांविरोधात मोहीम सुरू केली असून, पहिल्याच कारवाईत एका हॉटेलला वापरबंदीची नोटीस बजावण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बुधवारी परवाना विभाग प्रमुख स्नेहल पुण्यार्थी, अन्न निरीक्षक प्रवीण शिंदे तसेच प्रभाग समिती क्रमांक १ चे सहाय्यक आयुक्त समीर जावरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने खंडू पाडा परिसरातील 'बाबा हॉटेल' ची तपासणी केली. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अस्वच्छता आणि विविध अनियमितता आढळून आल्याने अन्न निरीक्षक प्रवीण शिंदे यांनी संबंधित हॉटेल चालकाला वापरबंदीची नोटीस बजावली.
संबंधित त्रुटींची पूर्तता करून आवश्यक सुधारणा केल्यानंतरच आणि त्याबाबतचा समाधानकारक अहवाल सादर केल्यानंतर हॉटेल पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती परवाना विभाग प्रमुख स्नेहल पुण्यार्थी यांनी दिली.
दरम्यान, भिवंडी शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर, अस्वच्छ स्वयंपाकगृहे आणि नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या हॉटेलांवर यापुढेही सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळाले आहेत.
या संयुक्त धडक कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांचे धाबे दणाणले आहेत.