भिवंडी : ठाणे गुन्हे शाखेच्या घटक दोन भिवंडी पथकाने महामार्गावर सापळा रचून दोन सराईत आरोपींना वाहनांसह अटक करत तब्बल ३१ कोटी ८४ लाख ८० हजार रुपये किमतीचा १५ किलो ९२४ ग्रॅम वजनाचा एमडी (मेथाम्फेटामीन) अमली पदार्थ जप्त केला आहे. हा मोठा साठा पकडण्यात पोलिसांना यश आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, दोन इसम रांजणोली भिवंडी बायपास भागात एमडीचा साठा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडी बायपासजवळ सापळा रचला आणि संशयित वाहनाची पाहणी करून कारवाई केली. या कारवाईमध्ये तनवीर अहमद कमर अहमद अन्सारी आणि महेश हिंदुराव देसाई या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून स्विफ्ट डिझायर ही कार, तसेच तब्बल १५ किलो ९२४ ग्रॅम एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या जप्त अमली पदार्थाची किंमत अंदाजे ३१ कोटी ८४ लाख ८० हजार रुपये आहे.
अटक केलेले दोन्ही आरोपी ठाणे आणि मुंबई परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आले होते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी असण्याची शक्यता असून, त्यांचा पोलीस प्रशासन कसून तपास करत आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर ही कार आरोपी तनवीर अन्सारी याची असल्याचे निष्पन्न झाले असून, बीएमडब्ल्यू नावाच्या दुसऱ्या वाहनाबद्दल तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, तनवीर अहमद कमर अहमद अन्सारी हा मुंब्रा, डायघर आणि भायखळा पोलीस ठाण्यातील नोंद असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा आरोपी आहे. तर, महेश हिंदुराव देसाई याच्यावर देखील कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या मोठ्या कारवाईनंतर ठाणे, भिवंडी परिसरातील अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.