भिवंडी: भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या भिवंडी महानगरपालिकेचे प्रभाग समिती क्रमांक तीनचे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर (५२ मूळ) यांना हुंदाई केटा गाडीत लाचेचा अडीच लाखांचा पहिला हप्ता स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती. या कारवाईमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. आरोपी भोईर यांची सर्वेअर तथा इमारत निरीक्षक म्हणून मूळ नियुक्ती असून त्यांच्याकडे सहाय्यक आयुक्त म्हणून अतिरिक्त कार्यभार होता.
भिवंडीतील प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी आरोपी भोईर यांनी तक्रारदार सुपर वायझर यांच्याकडे केली होती.
त्याबाबतची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. याबाबतची खातरजमा केल्यानंतर ठाणे पोलिसांनी सापळा रचला. लाचेचा अडीच लाखांचा पहिला हप्ता घेण्याचा दिवस ठरला.
मंगळवारी सायंकाळी सात वाजता प्रभाग समिती कार्यालयाबाहेरील मोकळ्या मैदानात स्वतः च्या हुंडाई क्रेटा कार क्रमांक एमएच-०१-डीके ६०८५ मध्ये तक्रारदाराकडून आरोपी अडीच लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर सुरेंद्र भोईर यांचा जबाब नोंदवून शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करून पहाटे अटक केली.
मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात पालिका कार्यालयात लाच लुचपत विभागाच्या चार कारवायांमध्ये सात कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. परंतु अशा कारवायानंतर या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक असताना प्रशासनाकडून मेहरबानी ठेवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.