ठाणे : लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना ठाकरे गटाला चांगले यश मिळाले असले तरी ठाण्यातील निष्ठावान खासदार राजन विचारे यांचा पराभव झाला. शिवसेना फोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सरकार स्थापन करीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुरते घायाळ केले. त्याचा वचपा हा विधानसभा निवडणुकीत काढण्याचा चंग ठाकरे यांनी बांधून त्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन आल्यानंतर पहिल्यांदा शनिवारी (दि.10) 'भगवा सप्ताहा'द्वारे ठाकरे हे कार्यकर्त्यांशी ठाण्यात संवाद साधून निवडणुकीची पुढील दिशा स्पष्ट करतील.
शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश आले. शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगला होता. मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाणे जिल्हा बालेकिल्ला समजला जातो. यामुळेच शिवसेनेतील फुटीचे केंद्रबिंदू म्हणून ठाण्याकडे पाहिले जाते. शिवसेनेचे पाचही आमदार हे शिंदे यांच्यासोबत राहिले. अपवाद माजी खासदार राजन विचारे यांचा राहिला. त्यांचाही नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून शिंदे यांनी पराभव घडवून आणला.
विधानसभेच्या 18 जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात पुन्हा पाय रोवण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीत कुठल्या जागा कुणी लढाव्या आणि कार्यकर्त्यांना पुहा एकदा सक्रिय करीत कामाला लावण्यासाठी राज्यभरात भगवा सप्ताहाच्या माध्यमातून ठाकरे हे लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार शिवसेना ठाकरे गटाने आयोजित केलेल्या भगवा सप्ताहाला उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.