Pandit Bhimsen Joshi Hospital Negligence Pudhari
ठाणे

Pandit Bhimsen Joshi Hospital Negligence: भाईंदर हादरले! आयसीयूमध्ये उंदराने रुग्णाचा हात कुरतडला; निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार

जोशी शासकीय रुग्णालयातील धक्कादायक घटना; रक्ताने बेडशीट भिजले तरी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, वृद्ध महिलेचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 89 वर्षीय महिला रुग्णाचा हात उंदराने कुरतडून रक्तबंबाळ केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तर उजाडल्यानंतर रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला पहायला आल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. आयसीयूमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे त्याकडे रुग्णाची बेडशीट रक्ताने भिजल्यानंतरही लक्ष गेले नसल्याचा संताप आहेच. मात्र आता सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकार दरवर्षी आरोग्य क्षेत्रावर हजारो कोटींचा खर्च करते. सर्व सामान्य लोकांना स्वस्तात चांगले उपचार मिळावेत यासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही रुग्णांचा चांगले उपचार न मिळणे, निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयात घडला. वृद्ध रुग्णाचे नाव सुहासिनी माठेकर असे असून त्यांना हृदयासंबधीत विकाराने 12 मार्च रोजी जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू करून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. एरव्ही आयसीयूमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना सुद्धा अनेकदा प्रवेश निषिद्ध केला जात असताना या विभागात उंदराने मात्र विनासायास प्रवेश करून त्या रुग्णाचा हात कुरतडल्याची घटना 16 मार्च

रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामुळे त्यांच्या हातातून रक्त वाहू लागल्याने बेडवरील बेडशीट रक्ताने भिजली. मात्र त्यांचा मागमूस आयसीयूमधील कर्मचाऱ्यांना लागला नाही. सोमवारी उजाडल्यानंतर सकाळी 6 वाजताच्या सुमारास रुग्णाचा मुलगा त्यांना पाहण्यासाठी आयसीयूमध्ये आला असता त्याला उंदीर त्यांच्या आईचा हात कुरतडत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्या उंदराला हटकल्यानंतर आयसीयूमधील कर्मचाऱ्यांचे त्याकडे लक्ष वेधले. यानंतर सोमवारी दुपारी 4 च्या दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता केली जात आहे.

मनसे, शिवसेना (उबाठा) संतप्त कार्यकर्त्यांच रुग्णालयाला घेराव

1) यानंतर घटनेची व्हीडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होताच त्यावर सर्व स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला. त्याची दखल घेत उबाठा शिवसेनेच्या माजी नगरसेविका निलम ढवण व शहरप्रमुख प्रशांत सावंत तसेच मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे, पदाधिकारी हेमंत सावंत, सचिन पोपळे, रॉबर्ट डिसोझा, अभिनंदन चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

2) तर रुग्णालय अधिक्षक डॉ. जाफर तडवी यांना त्यांनी जाब विचारला असता डॉ. तडवी यांनी आयसीयूमध्ये घटनेवेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगून घटनेचा अहवाल वरीष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान मनसेने डॉ. तडवी यांच्या दालनात प्रवेश करून त्यांना जबाबदार धरीत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखून दालनाबाहेर काढले.

रुग्णालयातील बेजबाबदार घटना थांबेनात

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अशा बेजबाबदारीमुळे मागील एका घटनेत एक रुग्ण थेट रुग्णालयातून पळून गेला होता. तर दुसऱ्या घटनेत एका रुग्णाला लावण्यात आलेल्या सलाईनची बाटली रिकामी होऊन त्यात रुग्णाचे रक्त बाटलीभर जमा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे त्याकडे लक्ष गेले. यानंतर तिसरी घटना सोमवारी घडल्याने रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे रुग्णांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT