भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेने नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या महासभेत प्रशासनाने शहरातील 6 प्रभाग समित्यांतर्गत रचनेला मान्यता देण्याचा ठराव मांडला होता. त्याला काँग्रेस, शिवसेनेच्या मिरा-भाईंदर विकास आघाडीने विरोध करीत तो प्रभागांनुसार सलग करण्याची मागणी केली. त्याकडे दुर्लक्ष करीत भाजपने स्वतःच्या फायद्याच्या प्रभाग रचनेला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 29(अ) अन्वये बहुमताने मंजुरी दिली.
यामुळे मंजूर ठरावाप्रमाणे त्या-त्या प्रभागांमध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त झाल्याने त्या प्रभाग समित्यांमध्ये भाजपचेच सभापती विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले. तर काँग्रेसचे अनिल सावंत यांनी सलग प्रभाग रचनेची केलेली मागणी अमान्य करण्यात आली.
यातील सावंत यांच्या ठरावाला मान्यता मिळाली असती तर प्रभाग समिती क्रमांक 5 मध्ये काँग्रेसचा सभापती विराजमान होण्याची आशा पल्लवित झाली असती. मात्र विरोधकांच्या मानसुब्याला छेद देत सत्ताधारी भाजपने स्वतःच्या फायद्याची प्रभाग समितीची रचना करीत सर्व प्रभाग समित्यांवर भाजपच्या सभापतींची वर्णी लावण्याचा मार्ग मोकळा केला.
पालिकेने 2025-26 मधील निवडणूक प्रभागांची हद्द लक्षात घेऊन आणि क्षेत्र संलग्नता विचारात घेऊन 6 प्रभाग समित्या स्थापन करणे आवश्यक होते. प्रभाग समितीची कामे पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, वादळी पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, स्वच्छता विषयक बांधकामे, विविध विकास योजनांसंबंधित शिफारशी करणे आणि त्यांचा नियतकाल वा कालांतराने आढावा घेणे, प्रभागातील उपवनांची देखभालीची सुनिश्चित करणे, प्रत्येक निवडणूक प्रभागाला यथायोग्य प्रमाणात अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप करण्याकरिता शिफारस करण्यावरून स्थानिकांसाठी प्रभाग समिती कार्यालय जवळ असणे किती गरजेचे आहे, त्याची सविस्तर माहिती काँग्रेसचे अनिल सावंत यांनी सभागृहाला दिली.
मात्र प्रशासकीय गोषवऱ्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रभाग समित्यांची रचना झाल्यास भाईंदर पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 9 मधील रहिवाशांना मीरारोड येथील प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये जाण्यासाठी साधारणतः तीन किलोमीटर पर्यंतची पायपीट करावी लागेल. तसेच प्रभाग क्रमांक 19 मधील रहिवाशांना प्रभाग समिती क्रमांक 6 मध्ये जायचे झाल्यास साधारणतः साडेपाच किलोमीटर पर्यंतची पायपीट करावी लागेल.
यात 6 प्रभाग समित्यांची रचना करतेवेळी प्रशासनाने लोकसंख्येचा विचार केला नसल्याचा आरोप सावंत यांनी केला. त्यांनी प्रभाग समिती निहाय लोकसंख्येचा लेखाजोखा सभागृहापुढे मांडला. तर मीरारोड येथील हैदरी चौक परिसरात पालिकेचे प्रभाग समिती क्रमांक 5 चे कामकाज चालते.
त्यात प्रभाग क्रमांक 9 व प्रभाग क्रमांक 19 चा समावेश होतो. या दोन्ही प्रभागांचा प्रभाग समिती 5 मध्ये समावेश न करता प्रशासकीय गोषवाऱ्यात प्रभाग क्रमांक 9 हा प्रभाग समिती क्रमांक 4 तर प्रभाग क्रमांक 19 हा प्रभाग समिती क्रमांक 6 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. जर हे दोन्ही प्रभाग प्रभाग समिती क्रमांक 5 मध्ये समाविष्ट झाल्यास त्यावर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण होऊन त्यावर काँग्रेसचा सभापती विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असता.
मात्र प्रशासनाने सादर केलेल्या गोषवाऱ्यानुसार हे दोन्ही प्रभाग इतर प्रभाग समित्यांमध्ये समाविष्ट केल्याने त्यावर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. यापूर्वीच्या महासभेत देखील अशा प्रकारचा गोषवारा प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. त्याविरोधात कांॅग्रेसने न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र न्यायालयाने काँग्रेसची याचिका फेटाळून लावल्याचे भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. अखेर भाजपचे नगरसेवक ॲड. रवि व्यास यांनी प्रशासकीय गोषवाऱ्याप्रमाणे ठराव मांडला तर काँग्रेसचे अनिल सावंत यांनी त्याविरोधातील ठराव मांडला.
महापौर डिंपल मेहता यांनी त्यावर मतदान घेण्याचे निर्देश नगरसचिव दिनेश कानगुडे यांना दिले. त्यात भाजपचा ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे महापौरांकडून जाहीर करण्यात आले.