मिरा रोड : व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने उकळल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत आरोपी हा व्हिडीओ कॉलवर बोलत होता. त्यावेळी त्याने स्वतः नग्न होऊन तरुणीलाही कपडे काढण्यास भाग पाडले. तरुणी नग्न अवस्थेत असताना आरोपीने त्याचे गुपचूप स्क्रीन रेकॉर्डिंग केले. त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
आरोपीने बदनामीची भीती दाखवून तरुणीच्या घरातील सोन्याची रिंग, नथनी, सोन्याची चेन, झुमके, सोन्याचे हार, बांगड्या, कडे व मांगटिका असा एकूण १४०.५ ग्रॅम वजनाचे सुमारे ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तिच्याकडून उकळले. इतकेच नव्हे तर, दागिने घेण्यासाठी तरुणी भाईंदर पश्चिम येथे आली असता, तिला मिरा रोड स्टेशनवर सोडतो असे खोटे सांगून तो तिला गोराई येथे घेऊन गेला. तेथे आरोपीने तिचा विनयभंग केला.
या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी आरोपी जेनिश भंसाली विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी जेनिश भंसाली याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत हे करत आहेत.