दरम्यान लोकार्पणावेळी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, कविता बोरकर, प्रणाली घोंगे, महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता पाटील, उपसभापती हेमा बेलानी आदींसह नगरसेवक, नगरसेविका, पालिका अधिकारी, कर्मचारी व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. pudhari photo
ठाणे

Mira Bhayandar civic issue : भाईंदरमधील क्रीडासंकुल, सभागृहाच्या लोकार्पणावरून जुंपली

आ. नरेंद्र मेहतांनी केले उद्घाटन; राजशिष्टाचार पाळला नसल्याची सरनाईक यांची मुख्य सचिवांकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेने बांधलेल्या भाईंदर पश्चिमेकडील नवीन जैनाचार्य श्री विजय अभयदेव सूरिश्वरजी महाराज साहेब क्रिडा संकुल व सभागृहाचे लोकार्पण बुधवारी, दि. 15 एप्रिल रोजी आ. नरेंद्र मेहता यांच्या हस्ते संपन्न झाले. तर या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचार पाळण्यात आला नसल्याची तक्रार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे केली आहे. त्यामुळे मेहता आणि सरनाईक यांच्यामध्ये पुन्हा राजकिय वाद उफाळला आहे.

या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर डिंपल मेहता या होत्या. या नवीन क्रीडा संकुलामुळे शहरातील खेळाडूंना तर प्रामुख्याने भाईंदर पश्चिमेकडील खेळाडूंना पर्यायी क्रीडा संकुलाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यापूर्वी पालिकेने भाईंदर पूर्वेला सुरु केलेले क्रीडा संकुल त्यातील अल्पवयीन मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर बंद ठेवल्याने नवीन क्रीडा संकुल त्याला पर्यायी ठरल्याचे आ. मेहता यांच्याकडून सांगण्यात आले.

या संकलातील पहिल्या मजल्यावर बहुद्देशीय सभागृह, पॅन्ट्रीचा समावेश असून दुसऱ्या मजल्यावर प्रशिक्षक रूम, ग्रंथालय, पूल व स्नूकर, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, जिम, स्टोअर रूमचा समावेश आहे. तिसऱ्या मजल्यावर स्क्वॉश, बॉक्सिंग, तायक्वांडो कोर्ट व पॅन्ट्रीचा समावेश आहे. शेवटच्या व चौथ्या मजल्यावर स्पोर्ट्स बार, क्रिकेट टर्फ व पॅन्ट्री तर टेरेसवर बॅडमिंटन, किचन, स्पोर्ट्स बार व पॅन्ट्री तसेच या क्रीडा संकुलात पिकल बॉलसह स्विमिंग पूल प्रस्तावित करण्यात आला आहे.

या क्रीडा संकुलासाठी उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले. तर या वास्तूच्या निर्मितीत योगदान दिलेले शहर अभियंता दीपक खांबित यांचा आ. मेहता यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत पालिका प्रशासनाने राजशिष्टाचार पाळला नसल्याची तक्रार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. त्यात त्यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व लोकसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य व विधानसभा सदस्य यांना योग्य ती पूर्व सुचना देऊन आमंत्रित करण्याचे निर्देशित करण्यात आले असताना नवीन क्रिडा संकुल व सभागृह लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत आपण स्थानिक आमदार तथा राज्याचा कॅबीनेट मंत्री असूनही आपले नाव जाणीवपूर्वक आ. नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता यांच्या नावांखाली छापण्यात आल्याचे नमूद केले आहे.

हि बाब राजशिष्टाचारास धरुन नाही. या लोकार्पण सोहळ्याची निमंत्रण पत्रिका राज्याचा राजरिष्टाचार विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांचेकडून तपासून व प्रमाणित झाल्यानंतर छापणे अपेक्षित असताना पालिका आयुक्तांनी तसे केले नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT