Crime News pudhari photo
ठाणे

Thane crime: भाईंदरमधील सुरभी पॅलेस लॉजिंग बोर्डिंगवर छापा

अनैतिक देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : भाईंदर पश्चिम येथील एका नामांकित लॉजिंगवर छापा टाकून मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने अनैतिक देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मोरवा गाव, उत्तन रोड येथील सुरभी पॅलेस लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये सुरू असलेल्या या काळ्या धंद्याप्रकरणी व्यवस्थापक, वेटर आणि एका महिला एजंटला अटक करण्यात आली असून, एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे.

मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेकडून गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, उत्तन रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर असलेल्या सुरभी पॅलेस लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये व्यवस्थापक आणि वेटर संगनमताने वेश्याव्यवसाय चालवत आहेत. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला.

गुन्हे शाखेच्या पथकाने एका बनावट ग्राहकाला सुरभी पॅलेसमध्ये पाठवले. ग्राहक आल्यानंतर हॉटेलचा वेटर महिला एजंटशी संपर्क साधून मुली मागवून घेत असल्याचे स्पष्ट होताच, दबा धरून बसलेल्या पथकाने तात्काळ छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक, वेटर आणि महिला एजंट अशा तिघांनाही रंगेहाथ बेड्या ठोकल्या.

घटनास्थळावरून एका तरुणीची सुटका करून तिची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये लॉज मालकासह इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT