राजू काळे
भाईंदर: भाईंदर पूर्वेकडील जुना पेट्रोल पंप ते भाईंदर फाटक दरम्यान बांधण्यात आलेला बॉटल नेक फेम उड्डाणपूल गेल्या अनेक महिन्यांपासून तांत्रिक कारणास्तव वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी केव्हा खुला होणार, अशी विचारणा लोकांकडून होऊ लागली आहे.
हा उड्डाणपूल भाईंदर पूर्व, पश्चिमेला जोडला जाणार असला तरी सध्या त्यावरून जुना पेट्रोल पंप ते भाईंदर पूर्व फाटक दरम्यानची वाहतूक निर्गमित करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल चार पदरी असून तो फाटकच्या दिशेने दोन पदरी करण्यात आला आहे.
बंद करण्यात आलेले दोन पदरी मार्ग भाईंदर पूर्व, पश्चिमेला जोडल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाला जोडले जाणार आहेत. मात्र सध्या बंद करण्यात आलेले दोन मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने प्रसार माध्यमांनी अशा बॉटल नेक उड्डाणपुलावर आरोपांच्या फैरी झाडल्या.
त्याची दखल संसदेसह विधानसभा अधिवेशनात घेण्यात आली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उड्डाणपुलाचे तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले. मात्र या उड्डाणपुलाचे काम पूर्णपणे झाल्याचे ठेकेदाराच्या एका अधिकाऱ्याने दबक्या आवाजात सांगितले आहे.
यामुळे या उड्डाणपुलावरील वाहतूक सुरु होण्याकडे आता लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. हा उड्डाणपूल सध्याच्या भाईंदर पूर्व, पश्चिमेला जोडणाऱ्या एकमेव भारतरत्न स्व. इंदिरा गांधी उड्डाणपुलावरील वाहतुकीला पर्याय ठरणार असल्याने तो महत्वाचा मानला जात आहे.
या उड्डाणपुलामुळे भविष्यात गांधी उड्डाणपुलावरील वाहतुकीचे नियोजन होऊन लोकांचा प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे. या उड्डाणपुलाची निर्मिती झाल्यास गांधी उड्डाणपुलावरून उत्तनकडे जाणारी वाहतूक निर्गमित होईल तर पर्यायी तसेच नियोजित उड्डाणपुलावरून भाईंदर पश्चिमेकडील वाहतूक निर्गमित होण्यास मदत होणार आहे.
या उड्डाणपुलामूळे भाईंदर पश्चिमेकडील वाहतुकीचे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ मोठ्याप्रमाणात वाचणार आहे. तसेच इंधनाची बचत होऊन प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
याखेरीज हा उड्डाणपूल तयार झाल्यास काशिमीरा नाका ते भाईंदर पश्चिम दरम्यानच्या प्रवासाला लागणारा सुमारे अर्ध्या तासाचा वेळ मोठ्याप्रमाणात कमी होऊन तो अवघ्या 10 ते 15 मिनिटांवर येणार आहे. मात्र या उड्डाणपुलावरील वाहनांना भाईंदर पश्चिमेकडे मांदली तलाव येथे उतरण्यास पुरेशी जागाच नसल्याचा दावा करण्यात आल्याने त्याचा व्यवहार्यता अहवाल तांत्रिक अडचणीत सापडला होता.
हा उड्डाणपूल साकारल्यास पुलावर दुतर्फा दोन पदरी ऐवजी एक पदरी मार्गच तयार करावा लागणार असल्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. या उड्डाणपुलाच्या बांधकामात पुरेशा जागेचा अडसर निर्माण झाल्याचा दावा केला जात असला तरी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले होते.
तर या उड्डाणपुलाखाली भाईंदर पूर्वेकडील महाराणा प्रताप सिंह व पश्चिमेकडील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रभावित होत असल्याने त्याला त्या-त्या समाजातील अनुयायांनी विरोध दर्शविला आहे. तसेच हे दोन्ही पुतळे इतरत्र स्थलांतरीत करण्यास देखील विरोध झाल्याने नियोजित उड्डाणपुलाचे घोंगडे भिजत ठेवण्यात आले आहे.
तर हा उड्डाणपूल पश्चिम उपनगरासह ठाणे येथील कमी जागेतही बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांप्रमाणे (सॅटीस) बांधून भाईंदर पूर्व, पश्चिमेकडील वाहतुकीला पर्याय तसेच गती देण्याच्या उद्देशाने त्याचे बांधकाम करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएकडे रेटून धरली आहे. त्याला यश आले असून एमएमआरडीएने नियोजित भाईंदर पूर्व, पश्चिमेला जोडणारा पर्यायी उड्डाणपुल साकारण्याच्या आशा एमएमआरडीएने काही महिन्यांपूर्वी एक्स वर केलेल्या पोस्टमुळे पल्लवित झाल्या आहेत.
अपघात टाळण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात
हा उड्डाणपूल दुतर्फा सिंगल लेनचा असणार असून त्यानुसारच जुना पेट्रोल पंप ते गोल्डन नेस्ट दरम्यानच्या गोल्डन नेस्टकडील पुलाची उतरण बाजू सिंगल लेनची करण्यात आली आहे. तर जुना पेट्रोल पंप ते गांधी उड्डाणपूल दरम्यानच्या उड्डाणपुलावर चार लेनचा मार्ग करण्यात आला आहे.
तूर्तास या उड्डाणपुलाचे बहुतांशी काम पूर्ण झाल्याने त्याच्या फाटकाच्या दिशेकडील बॉटल नेकच्या ठिकाणी संभाव्य अपघात टाळण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात. आणि हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी तात्काळ खुला करावा व भाईंदर पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला देखील लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी लोकांकडून होऊ लागली आहे.