Bhayandar fire pudhari photo
ठाणे

Bhayandar fire : भाईंदर अग्नीतांडवांतील तिघांची ओळख पटली

22 सिलिंडर्सचा एका मागोमाग एक स्फोट; इंद्रलोक झोपडपट्टी पूर्णत: जळून खाक

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात अनधिकृतपणे बांधलेल्या झोपड्यांना शुक्रवारी, दि. 10 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यात तेथे वास्तव्य करणाऱ्या दोन 15 वर्षीय मुलांसह एकाचा होरपळून मृत्यू झाला. तर जखमींवर पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

इंद्रलोक परिसरात कमलेश गुप्ता नामक झोपडपट्टी माफियाने बेकायदेशीरपणे झोपड्या बांधून त्या गरजू व गरीब कामगारांना विकल्या आहेत. या झोपड्यांपैकी एका झोपडीला शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. मात्र लागलेली आग झपाट्याने आसपासच्या झोपड्यांमध्ये पसरल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात त्या झोपड्यांमधील तब्बल 22 एलपीजी सिलेंडर्सचा एका मागोमाग एक असा स्फोट होऊन आगीचे लोण इतरत्र पसरू लागले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्याठिकाणी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु करून बचाव कार्याला सुरुवात केली. त्यावेळी आगीत सापडलेल्या जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून त्यांना जोशी या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. तसेच आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह देखील बाहेर काढून ते उत्तरीय तपासणीसाठी जोशी रुग्णालयात पाठविण्यात आले.

मृतांमध्ये गुड्डू बालकिशन (46), सुरज नेकतअली मंडल (15) व रोहीतअली रेहमतअली मंडल (15) यांचा समावेश होता. आग नेमकी कशामुळे लागली, याची माहिती अद्यापही मिळाली नसली तरी अशा अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना शहरात सतत घडू लागल्या असून त्यावर पालिका गंभीर नसल्याचा आरोप सर्व स्तरातून होऊ लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT