मिरा रोड : भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत दवाखान्यात तपासणीसाठी गेलेल्या आरोपीने डॉक्टरला मारहाण करून चोरी केल्याप्रकरणी आरोपीला 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी हा तपासणी करण्यासाठी खासगी दवाखान्यात गेला होता. त्यावेळी आरोपीने फिर्यादी डॉक्टरला मारहाण करून फिर्यादीकडे असलेली रोख रक्कम, मोबाईल असा मुद्देमाल घेऊ न पळ काढला होता. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
भाईंदर पश्चिमेला असलेल्या एका दवाखान्यात आरोपी राशिद शकील खान (52) वर्ष रा. भाईंदर पश्चिम हा आरटीपीसीआर टेस्ट साठी दवाखान्यात गेला होता. त्यावेळी आरोपीला दुबईला जायचे असल्याने नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड लागेल असे फिर्यादी यांनी सांगितले. त्यावेळी आरोपी उद्या घेऊन येतो असे सांगून गेला.
थोड्यावेळाने आरोपी पुन्हा दवाखान्यात आला व फिर्यादीच्या डोक्यात हातोड्याने जोरजोरात मारून फिर्यादीच्या डोक्यास जबर दुखापत केली. फिर्यादीकडील मोबाईल, सोन्याची चेन, अंगठी, रक्कम, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड असा एकूण 93000 रुपये किमतीच्या वस्तू फिर्यादीकडून जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेला.
याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याबाबत ठाणे न्यायालयात सुनावणी सुरू होती. या आरोपीला 3 वर्ष शिक्षा व 10000 दंड न भरल्यास एक महिना शिक्षा तसेच दंड रकमेपैकी दहा हजार रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
14 साक्षीदारांची तपासणी
या गुन्ह्यात एकूण 14 साक्षीदार तपासले. या गुन्ह्याचे कामकाज सरकारी अभियोक्ता राजेंद्र पाटील यांनी पाहिले, तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पो. नि. अविराज कुऱ्हाडे, गुन्हे शाखा युनिट 1 काशीमीरा, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक प्रकाश जाधव, कोर्ट कारकून सफौ. संतोष गायकवाड व मपोअं सीमा युनूस पठाण यांनी कामकाज पाहिले.