मिरा रोड: कागदपत्रांची आवश्यक पडताळणी न करता तब्बल ४९५ कोटी ३० लाख रुपयांचा संशयित निधी परदेशात पाठविल्याचा धक्कादायक गैरव्यवहार भाईंदरमध्ये उघडकीस आला आहे.
आयकर विभागाच्या तक्रारीवरून सनदी लेखापाल महेंद्र पुरोहित (३३) याच्यासह दोन मध्यस्थांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयकर विभागाचे सहाय्यक संचालक सच्चिदानंद चौरसिया (५७) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. १ एप्रिल २०२२ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, निधी पाठविणाऱ्या व्यक्ती, व्यवसाय आणि संस्थांची लेखापुस्तके, करारपत्रे व अन्य अधिकृत कागदपत्रांची आवश्यक पडताळणी न करताच निधी भारताबाहेर वळविण्यात आला. आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२६-२७ दरम्यान आरोपींनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी या व्यवहारांना मदत केल्याचा आरोप आहे.
पोलीस संबंधित संस्थांचे पॅन क्रमांक, आर्थिक नोंदी आणि व्यवहारांची छाननी करीत आहेत. निधी कोणत्या बँक खात्यांमार्फत परदेशात गेला, तो नेमका कोणाकडे पोहोचला, अंतिम लाभार्थी कोण आहे आणि या संपूर्ण व्यवहारामागील सूत्रधार कोण, याचा शोध घेतला जात आहे.
कथित बोगस संस्थांची निर्मिती व आर्थिक व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही तपास होणार आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
बोगस संस्थांच्या नावाने व्यवहाराचा संशय
एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देशाबाहेर गेल्याने भारताच्या अधिकृत परकीय चलन साठ्याचे नुकसान होऊन आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. निधी हस्तांतरणासाठी वापरण्यात आलेल्या काही संस्था बोगस असल्याचा संशय असून, खोटी किंवा बनावट प्रमाणपत्रे वापरण्यात आली का, याचाही तपास सुरू आहे.