शहापूर (जि. ठाणे) : भातसा धरणाच्या मुख्य भिंतीतून व इतर ठिकाणाहून प्रति सेकंद 500 ते 700 लिटर पाण्याची गळती होत आहे. यावर योग्यवेळी दुरुस्तीचे उपाय न केल्यास भविष्यात धरणाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई व उपनगरांचे जीवनदायी स्रोत असलेले भातसा धरण अलीकडच्या काळात पाणी गळतीच्या समस्येमुळे चर्चेत आले आहे. धरणाच्या विविध भागांतून पाण्याची झिरप सुरू असून, यामुळे धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या धरणातून मुंबई महानगर पालिकेस दररोज 2,120 एमएलडी, तर ठाणे महानगर पालिकेला रोज 250 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.