Kalyan Dombivli civic issues pudhari photo
ठाणे

Thane News : रस्ता, पाणी, वीज द्या; नाहीतर गावात प्रवेश बंद!

कामे करा, मगच गावात या; भाल ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधींना सज्जड इशारा!

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आणि विजेच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत केडीएमसी क्षेत्रातील २७ गावांपैकी भाल ग्रामस्थांनी आता थेट लोकप्रतिनिधींनाच गावबंदीचा इशारा दिला आहे.

नगरसेवक, आमदार, खासदार तसेच महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही समस्या सुटत नसल्याने बुधवारी ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी काम होत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींना गावबंदी अशा आशयाचे फलक गावाच्या प्रवेशद्वाराजवळ झळकावण्यात आले आहेत.

भाल गावच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आयडियल कॉलेज ते मराठी शाळेपर्यंतच्या रस्त्याचे पूर्ण काँक्रीटीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गावात मूलभूत सुविधा द्या...

ग्रामस्थांनी स्वखर्चाने गावात जलवाहिन्या नेल्या असून, पाणी सोडण्यासाठी कर्मचारी नियमित उपलब्ध होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावातील माजी सरपंचांनाच पहाटे चार वाजता पाणी सोडण्यासाठी जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. तर गावातील वाढत्या लोकवस्तीमुळे महावितरणच्या विद्यमान ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार पडत असून वारंवार वीजपुरवठ्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी किंवा गावात अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. “निवडणुकीपुरते गाव आठवण्यापेक्षा मूलभूत सुविधा द्या. रस्ता, पाणी आणि वीज या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन काम सुरू करा, अन्यथा लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश देणार नाही,” असा इशारा भाल ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर केडीएमसी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतात का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT