ठाणे

Bhainder Ghodbunder Road Khadde | घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आता पालिका सरसावली

दुरुस्तीच्या कामाला वाहतूक शाखेच्या परवानगीची प्रतीक्षा: निधी नेमका कोणाकडून ?

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : राजू काळे

मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत असलेल्या घोडबंदर या राज्य महामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी पालिका पुढे सरसावली आहे. यासाठी पालिकेने वाहतूक शाखेकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार केला असून परवानगी मिळताच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले.

मिरा-भाईंदर व ठाणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा तसेच या मार्गावरून पश्चिम उपनगरातील प्रवाशांना नाशिक व पुणे येथे जाण्याकरीता महत्वाचा ठरणार्‍या घोडबंदर या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम नियोजित असून त्यासाठी एमएमआरडीएकडून खर्च केला जाणार आहे. तत्पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाने हा रस्ता दोन्ही महापालिकांकडे हस्तांतरीत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती नव्हे तर या महामार्गावरील चेना ते काजूपाडा दरम्यानच्या संपूर्ण रस्त्याचेच नवीन बांधकाम राज्याच्या पीडब्ल्यूडी विभागाकडून लाखो रुपये खर्च करून करण्यात आले होते.

मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या महिनाभरात त्याची पोलखोल होऊन रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले. हे खड्डे भराव करून दुरुस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न पीडब्ल्यूडी विभागाकडून त्यावेळी करण्यात आला होता. यानंतर हा रस्ता दोन्ही महापालिकांकडे हस्तांतरीत करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने पीडब्ल्यूडी विभागाचे चांगभले झाले आहे. तर यंदा या रस्त्यावरील खड्ड्यांची आरास निकाली काढण्यासाठी संबंधित महापालिकांना स्वतःच्या तिजोरीतून निधी खर्च करावा लागणार असल्याचे निदर्शनास आले आहे. मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील या महामार्गावरील फाऊंटन ते काजूपाडा दरम्यान पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी पालिका पुढे सरसावली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 2 कोटींचा खर्च अंदाजित करण्यात आला असला तरी पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता हा खर्च पालिकेला राज्य शासनाकडून देण्यात येणार का कि शासनाने रस्त्याच्या रुंदीकरणाची जबाबदारी दिलेल्या एमएमआरडीएकडून पालिकेला निधी उपलब्ध होणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, वाहतुकीच्या नियोजनासाठी स्थानिक वाहतूक शाखेकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परवानगी मिळताच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. यावेळी या मार्गावर गतवर्षीप्रमाणेच प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

पालिका हद्दीतील घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीचा आढावा घेण्याकरीता त्याची पाहणी केली आहे. खड्डे दुरुस्तीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. खड्डे दुरुस्तीवेळी या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या मोठ्याप्रमाणात उद्भवणार असल्याने स्थानिक वाहतूक शाखेच्या सहकार्याने येथील वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेकडे परवानगीची मागणी करण्यात आली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च तूर्तास पालिकेच्या तिजोरीतून करण्यात येणार असला तरी हा खर्च एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी शासनासह एमएमआरडीएकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
आयुक्त राधाबिनोद शर्मा, मिरा-भाईंदर महापालिका

खड्ड्यांची दुरुस्ती मास्टिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार

मिरा-भाईंदर महापालिकेने घोडबंदर या राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणी करीत त्याचा आढावा घेतला. यानंतरच्या पाहणीवेळी पालिकेच्या पीडब्ल्यूडी विभागासह खड्डे दुरुस्तीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराने या महामार्गावरील दोन स्पॉट निश्चित केले आहेत. त्यात काजूपाडा येथील मुंबईच्या दिशेकडील चढण व वळण आणि चेना गाव ते फाऊंटन टोल नाका दरम्यानच्या स्पॉटचा समावेश आहे. या महामार्गावरील खड्ड्याची दुरुस्ती मास्टिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार असून त्यासाठी कमाल एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातही पावसाचा व्यत्यय आल्यास दुरुस्ती मोहीम आणखी लांबणार आहे. मात्र पावसाने उघडीप घेताच या रस्त्याची दुरुस्ती किमान चार दिवसांत पूर्ण करण्याचा मानस पालिकेच्या पीडब्ल्यूडी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT