भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शहरातील 18 ते 35 वर्षे वयोगटातील युवक, युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या अनुषंगाने पालिका क्षेत्रातील आस्थापना तसेच उद्योजकांसह रोजगार इच्छुक युवक, युवतींना www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे पुढील 6 महिने डिबीटी पद्धतीने शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवार बारावी उत्तीर्ण ते पदवीधर, आयटीआय उत्तीर्ण, पदव्युत्तर असणे आवश्यक असून अशाच उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या उमेदवारांचा प्रशिक्षणाचा सहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर विशेष मुलाखतीद्वारे संबंधित उमेदवार किती सक्षम आहे, हे तपासून त्या उमेदवाराच्या पुढील रोजगाराचा निर्णय संबंधित आस्थापना किंवा कंपनीकडून घेण्यात येणार आहे. पालिका या शासकीय आस्थापनेने सुद्धा त्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असून याप्रमाणे शहरातील इतर शासकीय व खासगी आस्थापना व उद्योजकांना देखील त्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच पालिकेने तयार केलेल्या गुगल फॉर्ममध्ये नोंदणी करणे अनिवार्य असून हा फॉर्म पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध केला आहे. ज्यांना गुगल फॉर्म भरता येत नसेल त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील.