मुरबाड शहर : किशोर गायकवाड
मुंबईसारख्या महानगराची तहान भागविणारे मुरबाड तालुक्यातील बारवी धरण सध्या पाणी चोरीच्या गंभीर प्रकारामुळे चर्चेत आले आहे. धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पाणी उपसा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून याबाबत तात्काळ चौकशी व कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
सध्या मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बांधकामे व रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी दररोज हजारो लिटर पाण्याची गरज भासत असून याचाच गैरफायदा घेत अज्ञातांकडून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात थेट इंजिन बसवून पाणी उपसा केला जात असल्याचे दिसून येत आहे. बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कान्होळ व काचकोली परिसरात हे प्रकार सर्रास सुरू असून दिवस-रात्र टँकरद्वारे पाणी भरून नेले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था किंवा नियंत्रण यंत्रणा नसल्याने पाणी माफियांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे ठेकेदार व पाणी माफियांना अक्षरशः मोकळे मैदान मिळाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत अंबरनाथ विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र छत्रे यांना विचारणा केली असता, “धरणातून पाणी उपसा करण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. या प्रकरणाची माहिती घेऊन वरिष्ठांशी चर्चा केली जाईल.” असे सांगितले. त्यामुळे आता प्रशासनाच्या भुमीकेकडे लक्ष लागले आहे.
धरणाचे पाणलोट क्षेत्र असुरक्षित...
बारवी धरण उभारण्यासाठी अनेक गाव-पाड्यांचे विस्थापन झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी पाण्याखाली गेल्या असून दीर्घ संघर्षानंतर हे धरण उभे राहिले. मात्र आज त्याच धरणाचे पाणी असुरक्षित राहिल्याने भविष्यात मोठ्या संकटाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारवाईची मागणी...
स्थानिक नागरिकांकडून पाणी चोरी करणाऱ्या घटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच धरण परिसरात सुरक्षा यंत्रणा, तपासणी नाके व सीसीटीव्ही बसविण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.