Barvi Dam Water Level Pudhari
ठाणे

Barvi Dam | पुढील ४८ तासांत बारवी धरण ओव्हरफ्लो?; नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

सध्या धरणात २४३.६६ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा

पुढारी वृत्तसेवा

Thane Barvi Dam Alert

डोंबिवली : बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी (दि. २५) दुपारी बारा वाजताच्या अधिकृत नोंदीनुसार बारवी धरणाची पाणी पातळी ६९.०६ मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. सध्या धरणात २४३.६६ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ७१.९१ टक्के भरली आहे.

बारवी धरणाची कमाल ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. सध्या धरण ओव्हरफ्लो पातळीपेक्षा ३.५४ मीटरने खाली आहे. गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे दर तासाला पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसही पाणलोट क्षेत्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील २४ ते ४८ तासांच्या कालावधीत बारवी धरण ओव्हरफ्लो होऊ शकते, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बारवी धरणावरून ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. याशिवाय शेतीसाठीही या धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कुणीही अनावश्यकपणे नदीपात्रात अथवा धरणाच्या सान्निध्यात जाऊ नये. तसेच लहान मुलांना पाण्याजवळ खेळण्यासाठी सोडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. एकंदर परिस्थिती पाहता पावसामुळे बारवी धरण वेगाने भरत असून यामुळे पुढील उन्हाळ्यासाठी पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT