बदलापूर : बदलापूर पूर्वेतील जुवेली परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या दुहेरी मृत्यूच्या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. निर्जन रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाजवळ एका महिलेसह ओला चालकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे बदलापूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नेमके काय घडले याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मृत महिला मनीषा भोसले या आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलासह परिचित असलेल्या गणेश शिंदे यांच्या चारचाकी वाहनातून घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच जुवेली परिसरातील सुनसान रस्त्यावर दोघेही मृतावस्थेत आढळल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
विशेष म्हणजे, घटनास्थळी त्यांचा तीन वर्षांचा मुलगा उपस्थित होता. या चिमुकल्याने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनंतर तपासाची दिशा बदलल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
परिसराची नाकेबंदी करून पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. वाहनाची तसेच घटनास्थळाची कसून तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासात महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर संबंधित पुरुषाने स्वतःवरही वार करून जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा प्रकार नेमका हत्या आणि आत्महत्येचा आहे की दुहेरी हत्येचा, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतरच सत्य समोर येणार आहे.
प्रेमसंबंध, वाद की अन्य कारण?
या घटनेमागे वैयक्तिक वाद, प्रेमसंबंध, आर्थिक व्यवहार की अन्य काही कारण आहे, याचा सर्व अंगांनी तपास सुरू आहे. मृतांच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज, तसेच नातेवाईक व परिचितांची चौकशी केली जात असून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.