बदलापूर : कुळगांव बदलापूर नगरपालिका सभागृहाने शहरात फेरीवाला धोरण मंजूर करून शहरात भरणारे बेकायदेशीर आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे बदलापूर शहरात खाजगी जागेवर रस्त्यावर कुठेही आठवडी बाजार भरणार नाही. तसेच असा आठवडी बाजार भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकी नंतर झालेल्या पहिलीच सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. यात शहरातील फेरीवाला धोरणाला मंजुरी देत आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूर शहरात यापूर्वी झालेल्या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी 900 हून अधिक फेरीवाल्यांचं नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे यातील पहिल्या टप्प्यात 300 फेरीवाल्यांना प्रत्येक प्रभागात जागा निश्चित करून देण्यात येणार आहे. ही जागा निश्चित करण्याचे जबाबदारी प्रभाग निहाय संबंधित नगरसेवकांच्या सूचनेनुसार देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 300 फेरीवाल्यांच पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर बदलापूर शहरातिल महत्त्वाच्या ठिकाणी फेरीवाल्यांना बसण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात येणार आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातील दीडशे मीटरमध्ये नो हॉकर्स जाहीर करण्यात आले असून या ठिकाणी पूर्णपणे फेरीवाल्यांचे उच्चाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे कुळगांव बदलापूर नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शहरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार आवाज उठवला यात भाजपचे संभाजी शिंदे यांनी स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी मांडलेल्या उच्छादाचा पाढा वाचला, तसेच येथील स्थानिक नगरसेविका रती पातकर यांनीही फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात आपली भूमिका मांडली. तर सभापती शैलेश वडनेरे यांनीही हे बेकायदेशीर बाजार तातडीने बंद करावे व या माध्यमातून पालिकेला कोणतेही उत्पन्न मिळत नसून त्याद्वारे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मत मांडले.
भाजपचे नगरसेवक राजेंद्र धुळे यांनी याबाबत सर्वात महत्त्वपूर्ण विषय मांडत दारूच्या दुकानांसमोर अनधिकृत हात गाड्या लावून तिथे दारू विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तर आदित्य पाटील यांनी खेतीवाल्यांवर केलेल्या कारवाईनंतर ते पूर्ण त्या ठिकाणी बसत असल्याचा मुद्दा प्रशासनाच्या समोर मांडला शिवसेनेचे नगरसेवक रोहन पाटील यांनी शहरातील बेकायदेशीर मच्छी विक्री करणाऱ्यांना अटकाव करण्याची मागणी केली.
शहरात हातगाडी येऊन बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तुकाराम म्हात्रे यांनी केली तसेच आठवडी बाजारानंतर शहरात होत असलेल्या कचऱ्याबाबत चर्चा झाली. तसेच टेम्पोमधन वस्तू विकणारे फेरीवाले भोंगा वाजून करत असलेल्या व्यवसायाबद्दल मागासवर्गीय समितीच्या सभापती हर्षाली गायकवाड यांनी मुद्दा उपस्थित करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
बदलापूर पूर्व परिसरात स्टेशनला लागून असलेली माघी गणेशोत्सव याची जत्रा दहा दिवस भरते.याबाबत शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील यांनी मुद्दा मांडत बेकायदेशीर आठवड्या बाजाराबरोबरच शहरात भरणाऱ्या जत्रांवर देखील बंदी घालण्याची मागणी केली. तसेच शहराच्या मुख्य रस्त्यावर दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ जत्रा भरवणं हा देखील आठवणी बाजारातच एक भाग असून त्या ठिकाणी कोणताही स्थानिक व्यापारी नसतात. त्यामुळे यावर ही निर्णय पालिका सभागृहाने घेण्याची मागणी श्रीधर पाटील यांनी केली. याबाबत स्वतः नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी प्रचंड तक्रारी येत असल्याचे सांगितलं. तर याच प्रभागातील स्थानिक नगरसेवक रती पातकर आणि संभाजी शिंदे यांनीही जत्रा बंद करण्याची मागणी केली. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी सांगितले.