बदलापूर : बदलापूर पूर्वेकडील कल्याण-कर्जत राज्य महामार्गावरील जेएनपीटी वडोदरा हायवे ला जोडणार्या रस्त्याशी लिंक होणार्या व भविष्यात बदलापूर शहराला वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे बदलापूर शहरातील भविष्यातील वाहतूक कोंडीची समस्या मिटणार आहे. कात्रप, शिरगांव ते जुवेली-खरवई रिंग रोडच्या कामाला सुरूवात झाली असून आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पार पडले.
कर्जत-कल्याणला जोडणारा राज्य महामार्ग बदलापूर पूर्वेकडील कात्रप, शिरगांव भागातून जातो. कात्रप परिसरात मोठी बाजारपेठ असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र आता न्यू पनवेल हायवेवरून कात्रप ते खरवई-जुवेलीपर्यंत बाह्यवळण रस्ता होणार असल्यानं बरचशी वाहतूक शहराच्या बाहेरून होईल. त्यामुळे कात्रप रस्त्यावरील ताण कमी होऊन वाहनचालकांची तसच पादचार्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
या रस्त्याला एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी आ. कसन कथोरे प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बदलापूर येथे आले असता त्यांनी शहरातील विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्याने या रस्त्यासाठी 90 कोटीहून अधिकचा निधी प्राप्त झाल्याची माहिती आ. किसन कथोरे यांनी दिली. या रस्त्यामुळे रिंगरोडमुळे हायवेलगतच्या परिसरातील विकासाला गती मिळेल असा विश्वासही यानिमित्ताने आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे.
विकासालाही गती मिळणार
बदलापूर पूर्वेकडील रिंग रोडशी जोडल्या जाणार्या शिरगांव, जुवेली, मानकिवली, खरवई या परिसरात नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक शेतकरी व विकासकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. या रस्त्याचे काम वर्षभरात पूर्ण झाल्यानंतर या भागातील नागरिकांनाही सुनियोजित सुसज्ज असे रस्ते उपलब्ध होणार आहेत.
रिंग रोड हा 120 फुट रुंदीचा असणार आहे. त्यामुळे भविष्यात बदलापूर शहरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या तर मिटणार आहेच. शिवाय या भागात विकासालाही गती मिळून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.