Badlapur Bakery Pudhari
ठाणे

Badlapur Bakery: केक शॉपमध्ये उंदरांचा वावर! बदलापूरातील दोन शाखांबाबत तक्रारी; एफडीएची कारवाई सुरू

या आरोपामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर: बदलापूरातील एका नामांकित केक साखळीच्या दुकानात उंदराचा मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित दुकानांवर तपास आणि कारवाई सुरू केली.

बदलापूर (कात्रप) येथील जुन्या पेट्रोल पंपाजवळील चौकातील अय्यंगार बेकरीमध्ये खारीवर उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, याच ब्रँडच्या बदलापूर पश्चिमेतील एका शाखेत स्थानिक नगरसेविका हर्षाली गायकवाड यांना उंदरांच्या विष्ठेमुळे दूषित झालेला केक देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानांची तपासणी सुरू केली असून आवश्यक ती कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. अलीकडेच एफडीएच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर अन्नसुरक्षेबाबत प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे चित्र आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT