MNS vs Thane Municipal Corporation Elections
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांनी खेळखंडोबा करून ठेवला आहे. वागळे प्रभागात शिवसेना सचिवाच्या पत्नीला बिनविरोध निवडून देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी षड्यंत्राने मनसेसह विरोधकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याचा आरोप मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. याविरोधात गुरुवारी (दि.१) मनसेने ठाणे महापालिकेवर धडक देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला.
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील अर्जाची छाननी बुधवारी निवडणुक कार्यालयामध्ये पार पडली. यामध्ये वागळे इस्टेट प्रभाग क्रमांक १६, १७ व १८ या प्रभागांमधील उमेदवारी अर्जाची छाननी निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षातील उमेदवारांचे अर्ज गंभीर त्रुटी असताना बाद केले नाहीत. उलट मनसेसह विरोधी पक्षातील आणि काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले.
यात वागळे प्रभाग क्रमांक १८ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा संजय मोरे यांनी सेनेच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या मनसेच्या प्राची घाडगे यांचा अर्ज केवळ रकान्यात 'निरंक' लिहिले नसल्याचा आक्षेप नोंदवून बाद ठरवला. अशा प्रकारे रकान्यात निरंक लिहिले नसलेले सत्ताधाऱ्यापैकी कुणाचाही अर्ज बाद केला नाही.
वास्तविक, अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांच्या अर्जातील रकाने रिकामे आहेत तसेच, अनेकांनी निर्धारीत वेळेनंतर आवश्यक कागदपत्रे जोडली असल्याचा आरोप मनसेने केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या ह्या पक्षपातीपणाचा जाब विचारण्यासाठी आज मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व बाधित उमेदवारांनी ठामपा मुख्यालयात धडक दिली. यावेळी निवडणुक यंत्रणेच्या पक्षपाती, अन्यायकारक वागणुकीचा पाढा वाचला.
त्यावर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे व उपायुक्त उमेश बिरारी यांनी चौकशी करण्याचे आश्वासन देऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीत हस्तक्षेप करू शकत नसल्याची हतबलता व्यक्त केली. तसेच, या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
वागळे इस्टेट प्रभाग क्रमांक १६, १७ व १८ या प्रभागांमधील उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी हे सर्व ठरवून केले आहे. छाननीपूर्वी अर्धातास आधी १०:३० वा. सर्व उमेदवारांचे अर्ज नोटीस बोर्डवर प्रदर्शित करणे गरजेचे असताना दुपारी साडेतीन वाजता अर्ज बाहेर लावले.
हा सर्व प्रकार तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मर्जीतील अधिकाऱ्याकरवी विरोधी व अपक्ष उमेदवारांविरोधात सत्ताधाऱ्यांनी षड्यंत्र रचले आहे. निवडणूक आयोग स्वायत्त राहिलेला नसून निवडणुक यंत्रणा सत्ताधाऱ्यांची बटीक बनल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केला.