कृष्णा जाधव -मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
माऊलींचं आसुरी प्रवृत्तीवरील भाष्य त्रिकाल सत्य असल्याने, ते आजच्या परिस्थितीला चपखल लागू पडताना दिसते. आसुरी विचार कसे असतात ? ते काय बोलतात ? ईश्वराबद्दल त्यांना तिटकारा असतो, तो कशामुळे? “काम” आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विविध विषयइच्छा यांच्या पाठी धावण यालाच ते जगण्याचं इतिकर्तव्य समजतात. कामेच्छा आणि त्यातून निर्माण झालेला अहंकार त्यापायी हे लोक सृष्टीचा संहार करण्यास क्षणभरही डगमगत नाहीत, किंबहुना विध्वंस हाच यांचा “धर्म” असतो. या आसुरी प्रवृत्तीस रोखता आले पाहिजे हा “विश्वधर्म” आणि आसुरी शक्तीपासून स्वतःला वाचविले पाहिजे हाच “स्वधर्म” याविषयी चिंतन आपण गतलेखात केले. आज आसुरींचा भोगसंचय पाहुयात.
॥ श्री ॥
श्री भगवंताने मानवास प्रचंड शक्ती दिलेली आहे, चौदा इंद्रियांच्या माध्यमातून मानव “पिंडी ते ब्रह्मांडी” जावू शकतो. विश्वाच्या पसाऱ्यात करोडो जीव-जडांच्या पेक्षा “मानवी” जीवन अमूल्य. आणि विश्वाच्या निर्मात्याने दिलेली सुंदर भेट आणि आशीर्वाद. जीवानं अनंत जन्माच्या केलेल्या पुण्यायीचे हे “फळ” मानवी जीवन अनेक जन्मात केलेल्या उत्तम कर्माचा “प्रसाद” त्यामुळे प्रत्येकाने दैवी संपदा स्वीकारणे आणि आसुरी संपदा दूर ठेवणे हे किती महत्त्वाचे आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. अध्यात्म हे प्रथम स्वतःला परिपक्व बनवते जगाची ओळख करून देते, म्हणूनच ते प्रत्येकासाठी संतसज्जनांनी दिलेली ज्ञानसंजीवनी आहे.
आसुरी “अन्यायाचे” माध्यमातून भोगांचा संचय करतो -जीवन हे भोगांचे आगर आहे. कर्माच्या माध्यमातून विषय-उपभोगणे हाच प्रत्येक जीवाचा दिनक्रम असतो. पण विषय भोगांच्या बाबत जागृतता ही अध्यात्म विचाराशिवाय केवळ अशक्य आहे. विषयांचा उपभोग घेत असताना मर्यादांचे भान आणि विषयांची निवड ही “विवेकाच्या” माध्यमातून करण्यासाठी मदत करतात ती अध्यात्मतत्वे. “न्यायाच्या माध्यमातून भोगांचा संचय” करणारी दैवी-संपदा आणि अन्यायाच्या माध्यमातून “आसुरी संपदा” समाजावर, स्वकीयांवर, सृष्टीवर, विश्वातील जड-जीवांवर अन्याय करत केवळ “स्वार्थांध” होऊन भोगांचा संचय करतात ते आसुरी प्रवृत्तीचे लोक शेकडो आशापाशांनी बांधलेले आणि काम-क्रोध-मोह परायण असलेले आसुरी अन्यायानेच भोगांचा संचय करतात.
अध्यात्मात विषय (इंद्रियइच्छा) याचा अर्थ अनेक इच्छा ज्यांच्या पूर्ततेसाठी जीव अहोरात्र धावतो. चौदा इंद्रिये मानवी जीवनावर आणि विशेषतः आसुरींच्या जीवनावर अधिराज्य गाजवतात. आसुरी अहोरात्र विषयांच्या पाठी धावत इंद्रियांचे लाड करतात, पाच ज्ञानेंद्रिये (कान, नाक, त्वचा, जीभ, डोळे), पाच कर्मेंद्रिये (हात, पाय, वाचा, गुदा, लींग), चार आंतरइंद्रिये (मन, बुद्धी, चित्त, अहंकार) या चौदा इंद्रियांचे करोडो विषय, या विषयपूर्ततेपाठी धावत विषयासक्त कोशकिड्यासारखा अडकून पडतो.
जीवनाचं एक सूत्र किंवा सिद्धांत आहे, याविषयी माऊली अत्यंत स्पष्टपणे नमूद करतात, चौदा इंद्रियांच्या इच्छेपाठी धावणारा जीव जेव्हा इच्छा (विषय), अपूर्ण राहतात तेव्हा त्यांच्याठिकाणी क्रोध आणि द्वेष निर्माण होतो. विषय भोगांना तृप्त करण्यासाठी धन (पैसा, संपत्ती) आवश्यक असते. भरपूर पैसा मिळवायचा असेल तर तो मिळविण्यासाठी स्वैरपणाने (अन्यायाने) जगाला लुबाडावेच लागेल. लुबाडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर करावाच लागेल. हेच आसुरीच्या जगण्याचं सूत्र आणि त्यांचा मार्ग.
म्हणोनि भोगावया जोगा | पुरता अर्थ पैगा|
आणावया जगा| झोंबती सैरा ॥
इच्छा, कामनांना अंत नाही, जसजसा आसुरी आपल्या भयंकर मार्गाने पुढे-पुढे जातो, तस-तसा त्याच्या इच्छांना पारावार रहात नाही. त्यासाठी आवश्यक अर्थ (पैसा, संपत्ती) स्वैरपणे मिळवताना, ते जगण्याच्या आणि जीवनाच्या सर्व मर्यादा सहज ओलांडतात. स्वैरमार्गात त्यांना अडसर वाटतात त्यांचा ते अनेक मार्गाने काटा काढतात. “दैवासुर” संपत्ती कमावताना एवढे आंधळे होतात की, त्यांच्या मार्गातील ज्यांचा - ज्यांचा म्हणून व्यत्यय येईल, असे त्यांना वाटते, त्यांचा ते अत्यंत क्रूरपणे शारीरिक, मानसिक, सामाजिक, धार्मिक, राजनैतिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, कौटुंबिक पातळीवर छळ करतात. त्यासाठी ते हत्या, मंत्र-तंत्र यांचाही प्रसंगी वापर करतात. माऊली ओवीतून अशा आसुरी लोकांचे भयावह वास्तव समोर मांडताना म्हणतात.
एकांती साधुनी मारिती| एकाची सर्वस्वे हरिती|
एकालागी उभारिती| अपाययंत्रे॥परप्राण घातें| मेळविती वित्तें|
मिळाल्या चित्तें| तोषणें कैसे ?
धन-संपत्ती मग ती स्थावर असो की जंगम त्या माध्यमातून सत्ता, सत्तेच्या सहाय्याने शक्ती - सामर्थ्य, याच सामर्थ्याच्या बळावर व्यभीचार, व्यभीचाराला सीमा राहत नाहीत, त्यानिर्माण होणाऱ्या नवनवीन इच्छेच्या पूर्ततेसाठी पुन्हा धन-संपत्ती गोळा करण्यासाठी नव-नवीन अनिष्ट मार्ग. त्या मिळालेल्या संपत्तीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता आणि शक्तीचा विस्तार. ही अभिलाषा न थांबणारी. ही घृणास्पद स्वरूप धारण करून विश्वाला गिळूनही समाधान न होणारी अतृप्ती होय.
ऐसिन धना विश्वाचिया| मीचि होईन स्वामिया|
मग दिठ पडे तया | ऊरो नेंदी ॥
आसुरीच्या भुकेला विश्व अपुरे पडते. बकासुराला अन्न गाडीभर लागत असे. किमान त्याने तो महिनाभर शांत तरी रहात असे. इथे मात्र आसुरींची भूक क्षणाक्षणाला हिंस्त्र रूप धारण करत वाढत राहते. हजारो वर्षाच्या मानवी इतिहासाचा मागोवा घेतला तर युगानुयुगे “आसुरी” जन्माला येतात. मानवी समाज जीवनासह सृष्टीस अतोनात हानी पोहोचवतात. जन्माला येण्याचं, मानवी देह मिळाल्याचं अंतिम उद्दिष्ट “आत्मज्ञान प्राप्ती” हे त्यांच्या गावी नसते. शिवाय त्यांना “मृत्यू” येण्याच्या क्षणापर्यंत त्यांना मरण येणार आहे, याचीही जाणीव नसते. एकूणच काय विषयांध, मदांध, सतांध हा मानवी संस्कृतीस अत्यंत मारक असतो.
रामकृष्ण हरी