डोंबिवली (ठाणे) : लोकल प्रवासात हिंदीत बोलला म्हणून मारहाण झाल्यानंतर अर्णव खैरे या डोंबिवलीकर तरुणाने केलेल्या आत्महत्येची दखल पोलिसांनी अखेर पाच दिवसांनंतर घेतली आणि अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अर्णवला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचा कल्याण शहर पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
कल्याण ते ठाणे रेल्वेमार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास चार-पाच जणांच्या टोळक्याने मिळून केलेल्या मारहाणीनंतर कल्याणात राहणाऱ्या अर्णव जितेंद्र खैरे या १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्याथ्यर्थ्याने घरी येऊन जीवन संपविले. हा सारा प्रकार कल्याण ते ठाणे रेल्वेमार्गादरम्यान घडला होता.
लोकलमधून प्रवास करणाऱ्या टोळक्याच्या दहशतीला घावरून अर्णवने टोकाचे पाऊल उचलले असल्याने वास्तविक पाहता ज्या पट्ट्यात गुन्हा घडला त्या संबंधित लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मात्र अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घटनेच्या पाच दिवसांनंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.