बदलापूरच्या विकासाला मिळणार गती  pudhari photo
ठाणे

Badlapur Development : बदलापूरच्या विकासाला मिळणार गती

शहरातील सर्व 6 मीटर रस्ते आता 9 मीटर घोषित; पुनर्विकासाला मिळणार वेग

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत शहरातील सर्व 6 मीटर रुंदीचे रस्ते आता 9 मीटर म्हणून ग्राह्य धरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नगरपरिषदेकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने शहर विकासाला मोठी गती मिळणार आहे.

या निर्णयामुळे युडीसीपीआरअंतर्गत 9 मीटर रस्त्यांसाठी लागू असलेल्या सर्व विकास तरतुदी आता शहरातील या रस्त्यांना लागू होणार आहेत. परिणामी जुन्या, धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असून रीडेव्हलपमेंट प्रकल्पांना वेग मिळणार आहे.

तसेच अग्निशमन दल, रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांना अधिक सुलभ प्रवेश मिळणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होणार आहे. आधुनिक नागरी सुविधा, गृहनिर्माण प्रकल्प आणि व्यावसायिक विकासासाठी नव्या संधी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांच्या मालमत्तेच्या मूल्यवाढीलाही चालना मिळणार आहे.

या निर्णयाबद्दल आमदार किसन कथोरे, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, नियोजन व विकास समिती सभापती संभाजी शिंदे यांच्यासह नगरपरिषद प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदींचे आभार मानले आहेत.

“बदलापूरला आधुनिक, सुरक्षित आणि नियोजनबद्ध शहर बनविण्याच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे,” अशी प्रतिक्रिया संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

  • कुळगाव-बदलापूर शहराच्या विकासाला आता मेट्रो, रेल्वेचे जाळे, रस्ते रुंदीकरण आणि भव्य अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोठी गती मिळत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे बदलापूर हे मुंबई महानगर प्रदेशातील एक प्रमुख आणि वेगाने विकसित होणारे शहर बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT