

नायगाव : शहरातील वाढती वाहतूक, लोकसंख्या आणि अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नायगाव शहरातून जाणाऱ्या सुमारे २९ किमी रस्त्याच्या कामात बदल करून तो फोर लेन करण्यात यावा, अशी मागणी आता तीव्र झाली आहे. हेडगेवार चौक ते राजुरा मारोती मंदिरपर्यंत सुमारे १२०० मीटर फोर लेनसह सर्विस रोड उभारण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
सद्यस्थितीत शासनाच्या प्रस्तावानुसार केवळ २० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा विचार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नायगाव शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती वाहतूक आणि भविष्यातील गरजांचा विचार करता हा प्रस्ताव अपुरा असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, नायगाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे आणि शासकीय कार्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ २० मीटरचा रस्ता हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही.
हेडगेवार चौक ते राजुरा मारोती मंदिर या दरम्यानचा परिसर अत्यंत वर्दळीचा असून येथे फोर लेन रस्ता आणि सर्विस रोड उभारल्यास वाहतूक सुरळीत होईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे मत व्यक्त होत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिक, व्यापारी व विविध संघटनांनी एकत्र येत शासनाने तातडीने प्रस्तावात सुधारणा करून फोर लेन रस्ता मंजूर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मागणीसाठी पुढाकार घेणारे नागरिक
गजानन चव्हाण ,गजानन तमलुरे, संजय रामकिशन गुजलवार, बाबुराव माणिकराव चव्हाण, अशोक विठ्ठल पवार, माधव यादव चव्हाण, गणेश देगावे, प्रवीण बिरादार, माधव चव्हाण, साहेबराव तमलुरे, संतोष निळकंठराव तमलुरे, किशोर पुंडलिक गायकवाड, विठ्ठल बाबुराव वाघमारे आदींनी या मागणीसाठी पुढाकार घेतला असून त्यांनी लेखी निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.
नागरिकांचा इशारा
“नायगाव शहराचा वेगाने होत असलेला विकास आणि वाढती वाहतूक लक्षात घेता केवळ २० मीटरचा रस्ता अपुरा आहे. शासनाने तातडीने यामध्ये बदल करून फोर लेनचा निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघातांना सामोरे जावे लागेल,” असे मत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. प्रस्तावात बदल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला असून आता शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.