प्राचीन स्थापत्याचा महामेरू वेरुळ pudhari photo
ठाणे

Ellora Caves : प्राचीन स्थापत्याचा महामेरू वेरुळ

पुढारी वृत्तसेवा

नीती मेहेंदळे

प्राचीन आणि भव्य वारसास्थळं सांभाळणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात औरंगाबाद, आताचा संभाजीनगर जिल्हा. अजिंठा आणि वेरूळ हे त्याचे प्रमुख बालेकिल्ले. पैकी अजिंठा आणि त्याची लेणी हा स्वतंत्र विषयच आहे. वेरूळ किंवा एल्लोरा म्हणजे त्यात स्वतंत्र वेरूळ लेणी तर आहेतच शिवाय इतरही भरपूर स्थापत्य विविधता आहे. म्हैसमाळ डोंगरातून उगम पावणाऱ्या वेळगंगा किंवा एलगंगा नदीच्या अनुषंगाने वसलेलं वेरूळ हे एक रम्य गाव. या वेळगंगा नदीकाठीच वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहेत. ती मुख्यतः जगातील सर्वात मोठ्या एकाच अखंड खडकात कोरलेल्या म्हणजेच एकपाषाणी कैलास मंदिरासाठी. याच प्रकारचा खडक जवळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या बांधकामात वापरला गेला आहे आणि बीबी-का-मकबराच्या मार्गांच्या फरसबंदीसाठीही त्याचा उपयोग करण्यात आला आहे.

इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये वेरूळचे महत्त्व, त्या काळात राज्य करणाऱ्या सातवाहन राजवंशाच्या नाण्यांच्या शोधावरूनही समजते. सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (आधुनिक पैठण) येथे होती आणि वेरूळ हे अरबी समुद्रावरील पश्चिम बंदरांना जोडणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गांचा एक भाग होते. ज्यात सोपारा, कल्याण हे एक भरभराटीचे बंदर, चौल, शिलाहारांचे चेमुल, तेर, भोकरदन इत्यादींसारख्या अंतर्गत शहरांचा समावेश होता. वेरूळ हे थेट एका प्राचीन व्यापारी मार्गावर वसलेले आहे, जो प्रतिष्ठानपासून औरंगाबाद, वेरूळ, पितळखोरा, पाटणे, नाशिक (आधुनिक नाशिक) मार्गे जात होता. पण प्राचीन व्यापारी मार्गावर स्थान असूनही, सातवाहन राजवटीत वेरूळमध्ये कोणत्याही मोठ्या हालचाली झाल्या नाहीत. जवळच्या पितळखोरा, नाशिक, अजिंठा इत्यादी ठिकाणी आधीच मोठ्या प्रमाणावर काम सुरू होते आणि यामुळे प्राचीन बांधकाम करणाऱ्यांचे लक्ष येथील कामाकडे थोडं उशिरा वळलं असावं.

Also read:माऊली

अशा प्रकारे वेरूळमध्ये सर्वात मोठ्या गुंफा खोदकामांपैकी एक उदयास आले. या गुंफांचा काळ अंदाजे इ.स. 6व्या-7व्या शतकापासून ते 11व्या-12व्या शतकापर्यंतचा आहे. या डोंगररांगेत अनेक गुंफा आहेत, त्यापैकी 34 गुंफा प्रसिद्ध आहेत. या गुंफा एका मोठ्या पठाराच्या कड्यामध्ये खोदलेल्या आहेत, जो कडा सुमारे 2 कि.मी.र्यंत उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेला आहे. हा कडा अर्धवर्तुळाकार आहे. एलगंगा नदीच्या काठावर व एका वरच्या पठारावर गुंफांचे आणखी दोन गट आढळतात, ज्यांना गणेश लेणी आणि जोगेश्वरी लेणी म्हणून ओळखले जाते.

या धार्मिक स्थळांना राजाश्रय मिळत असे. वेरूळ लेण्यांमध्ये तसा एकमेव निश्चित शिलालेखाचा पुरावा राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग (इ.स. 753-57) याचा आहे, जो गुंफा 15 च्या पुढील मंडपाच्या मागील भिंतीवर आहे. भव्य कैलास मंदिर (गुंफा 16) हे दंतिदुर्गाचा उत्तराधिकारी आणि काका कृष्ण पहिला (इ.स. 757-83) यांच्याशी संबंधित मानले जाते. कर्क दुसरा (इ.स. 812-13) यांच्या काळातील बडोद्याच्या एका ताम्रपटात या वास्तूच्या महानतेबद्दल सांगितले आहे.

वेरूळ येथील धार्मिक स्थळांची सुरुवात अजिंठ्यातील परंपरेच्या समाप्तीशी जुळते. हे सर्वज्ञात आहे की राष्ट्रकूट सत्तेवर येण्यापूर्वीच येथे उत्खनन सुरू झाले होते आणि गुंफा 1 ते 10 आणि गुंफा 21 (रामेश्वर) निश्चितपणे त्यांच्या आधी बांधल्या गेल्या होत्या. इथे कलचुरी, राष्ट्रकूट नि चालुक्य सत्ता होऊन गेल्याचे समजते. वेरुळमधली बहुतेक लेणी राष्ट्रकूट काळातील मानली जातात, जे तत्कालीन काळातील धार्मिक सहिष्णुता दर्शवते. गुंफा निश्चितपणे राष्ट्रकूटांनंतरच्या काळातील आहेत,हे त्यांच्या निर्मितीची शैली आणि अपूर्ण शिलालेखांवरून दिसून येते. या काळात हा प्रदेश कल्याणी चालुक्य आणि देवगिरीच्या दौलताबाद यादवांच्या अधिपत्याखाली होता. आपल्याला एकाच ठिकाणी विविध धर्मांचा सर्वात मोठा संगम पाहायला मिळतो, जो विविध पंथांमधील धार्मिक सहिष्णुता आणि एकतेचे प्रतीक आहे.

वेरूळचं अजून एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. आत्ताचं मंदिर जीर्णोद्धारीत आहे हे पाहून लक्षात येतं पण ते फार जुनं आहे. मूळ मंदिर राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याने अतिप्राचीन काळात बांधले होते. काही प्राचीन धर्मग्रंथांमध्ये नमूद केल्यानुसार, या ठिकाणाला ‌‘कुसुमेस्वर‌’ या दुसऱ्या नावानेही ओळखले जाते. आठव्या शतकातील राष्ट्रकूट राजाने वेरूळ गावात, महिषाद्रीच्या पायथ्याशी, एलागंगा नदीच्या काठावर हे भव्य आणि सुंदर मंदिर बांधले. इ.स. 750 च्या सुमारास कृष्णरायाने त्याचा जीर्णोद्धार केला. नंतर, शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी इ.स. 1599 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला.

सध्याचे मंदिर लालसर वाळूच्या दगडांनी बांधलेले आहे आणि यामुळे त्याला एक विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. गाभाऱ्यासमोरील सभामंडप तीन बाजूंनी खुला आहे. हे मंदिर दक्षिणाभिमुख असून एका चौथऱ्यावर उभे आहे. मंदिराला तीन द्वारे असून त्यातलं एक महाद्वार आहे. मंदिरात दोन कक्ष आहेत, एक मोठा सभामंडप ज्यात सुंदर कोरीवकाम केलेले खांब आहेत आणि एक गर्भगृह ज्यात मंदिराच्या भूमिगत कक्षात काळ्या दगडाचे ज्योतिर्लिंग स्थापित आहे. येथे साजरा होणारा सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी भगवान शिवाची पालखी मिरवणूक मंदिरातून शिवालय तीर्थ कुंडापर्यंत काढली जाते.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची एक रम्य कथा पुराणात सापडते. दक्षिण देशात, देवगिरी पर्वताजवळ सुधर्मा नावाचा एक तेजस्वी तपस्वी राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदेहा होते. त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यांना मूलबाळ नव्हते. ज्योतिषीय गणितानुसार, सुदेहाच्या गर्भातून संतती होऊ शकत नव्हती. सुदेहाला मुलांची खूप हौस होती. तिच्या हट्टापायी त्याने सुदेहाच्या बहिणीशी घुश्माशी लग्न केले. ती शंकराची परमभक्त होती. दररोज मातीची एकशे एक शिवलिंगे बनवून ती त्यांची भक्तिभावाने पूजा करत असे. काही दिवसांनी शंकराच्या कृपेने तिला अतिशय सुंदर आणि निरोगी पुत्र झाला. बाळाच्या जन्माने सुदेहा आणि घुश्मा या दोघींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पण काही काळानंतर सुदेहाच्या मनात मत्सर उत्पन्न झाला.

दरम्यान, घुश्माचा मुलगाही मोठा होत होता. हळूहळू तो तरुण झाला. त्याचे लग्नही झाले. अखेरीस, द्वेष वाढत जाऊन एके दिवशी सुदेहाने रात्री झोपेत घुश्माच्या तरुण मुलाची हत्या केली. तिने त्याचे शरीर त्याच तलावात फेकून दिले, जिथे घुश्मा दररोज मातीची शिवलिंगे विसर्जित करत असे. सकाळी सर्वांना ही गोष्ट कळली. संपूर्ण घरात हाहाकार माजला. पण घुश्मा शिवाच्या पूजनात मग्न राहिली, जणू काही घडलेच नव्हते. पूजा संपवून ती मातीची शिवलिंगे तलावात विसर्जित करण्यासाठी निघाली. तेव्हा तिच्या पुण्याईने तिचा मुलगा जिवंत होऊन परतला.

भगवान शिव प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि त्यांनी घुश्माला वरदान मागण्यास सांगितले. ते सुदेहाच्या घृणास्पद कृत्यामुळे खूप क्रोधित होते. पण घुश्माने हात जोडून देवाला वेरूळमध्ये वास्तव्य करण्याची विनंती केली व बहिणीसाठी क्षमा मागितली. शिवाने या दोन्ही गोष्टी मान्य केल्या. ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट होऊन ते तिथे राहू लागले. सती शिवभक्त घुश्माच्या पूजेमुळे, ते येथे घुश्मेश्वर महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले. घृष्णेश्वराचं हेही एक नाव मानलं जातं.

याशिवाय गावात अहिल्याबाई शिवालय तीर्थकुंड ही एक चौरसाकृती बारव आहे. वेरूळ गावात भोसल्यांची गढी होती. मालोजी भोसलेंचं स्मारक या गढीत आहे. आज गढीत केवळ इमारतींची जोती काय ती उरली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT