

कृष्णा जाधव - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
क्षर आणि अक्षर पुरुषांना जाणून घेताना आपण गतलेखात बीजभाव, फलभाव आणि विपरीत ज्ञान यांस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जगातील सर्व मानव समूहांमध्ये जगात येण्याबाबत आणि कार्य करण्याबाबत तात्त्विक पातळीवर जे विचारमंथन झालं त्यामध्ये सर्वाधिक सहभाग हिन्दुस्थानामधील तत्त्वचिंतकांचा आहे. गीतातत्त्व हे अखंड विश्वाला मिळालेलं अमूल्य तत्त्वज्ञान आहे. त्यावरील भाष्य श्री ज्ञानेश्वरी. यामध्ये मांडलेल्या विपरीत ज्ञान तत्त्वाचे आपण गतलेखात चिंतन केलं. उत्तम पुरुष समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाने टाकलेलं ते पहिले पाऊल. आजच्या लेखात उत्तम पुरुषाचा विविध पैलूंनी मागोवा घेऊ यात.
॥ श्री ॥
क्षर हा विश्वाला आपले घर मानणारा, अक्षर हा भगवंत विश्वरूप आहे हे जाणणारा तर उत्तम पुरुष हा भगवत् स्वरूपास प्राप्त होणारा. क्षर हा अज्ञानाच्या अंध:कारात जन्मापासून मृत्यूपर्यंत खितपत पडलेला असतो. अक्षराने भगवत् स्वरूप सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू केलेला असतो तर उत्तम पुरुष स्वधर्म सूर्य भगवंतमय झालेला असते. उत्तम पुरुष हा क्षर-अक्षरापासून वेगळा असतो. त्याला ‘परमात्मा’ म्हणतात. मानवाचा प्रवास क्षराकडून अक्षराकडे आणि अक्षराकडून उत्तम पुरुषांकडे होण्यासाठी साधना करावी लागते. अक्षर पुरुषास ज्ञानोपासनेची जिज्ञासा जागृत झालेली असते. ज्या क्षणी ‘ज्ञान-ज्योत’ त्याच्यात जागृत होते त्याक्षणी अज्ञानाचा अंधार नष्ट होतो. ज्या क्षणी ज्योत पेट घेते, त्या क्षणाला वात आणि ज्योत हे द्वैत संपतं.
ज्योत ही प्रकाशमय होते. तिथे प्रकाश हा ज्योतीठायी आहे की ज्योत ही प्रकाशाठायी हे सांगता येत नाही. ज्ञानज्योत ही अज्ञानाला नष्ट करत ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होते. ब्रह्माशी तदाकार झाल्याने तर जाणता-जाणणारा दोन्ही भेद नष्ट होवोन ऐक्याचं स्वरूप प्रगट होते. भक्त आणि भगवंत एकरूप झाल्यावर ज्याप्रमाणे ‘भक्ती’ शिल्लकच राहत नाही कारण भक्ताचे आणि भगवताचं द्वैत शिल्लक राहत नाही.
भजणारा हाच देव झाला तर मग भक्त व भगवंत ओळखायचा कसा? जिथे जाणणेपणाशिवाय जाणणे उरले, ते ज्ञान म्हणजे ‘उत्तम पुरुष’ होय.
तैसे अज्ञान ज्ञानें नेलें | आपण वस्तु देऊ न गेलें |
ऐसे जाणनेविण उरलें | जाणतें जें ॥
उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तमाचे स्वरूप खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ यात -
1. ज्याप्रमाणे लाकडामधील अग्नी हा लाकडापेक्षा वेगळा असतो.
2. प्रलयाच्यावेळी अतितेज निर्माण होऊन ना दिवस-ना रात्र अशी स्थिती निर्माण होते. त्याप्रमाणे उत्तम पुरुष अवस्था प्राप्त झाल्यानंतर अज्ञान- ज्ञान-ज्ञेय-ज्ञाता या अवस्था शिल्लक राहत नाहीत.
3. उत्तम पुरुषाच्या ठिकाणी द्वैत-अद्वैत, असणे-नसणे हा भेद राहत नाही. उत्तम पुरुष अनुभवात बुडून जातो अगदी अनुभव स्वरूप होतो. भगवत् स्वरूपाला प्राप्त होतो.
4. ‘ते ब्रह्म मी आहे’ अशा प्रकारचा बोधही जिथे अस्ताला जातो. सांगणारा सांगणे होतो, ऐकणारा ऐक्य होवोन राहता, पाहणारा स्वतः दृश्य होतो. थोडक्यात दृष्टा आणि दृश्य जिथे मावळले जाते ही अवस्था उत्तम पुरुषाची !!!
सोहं तेही अस्तवले | जेय सांगतेंचि सांगणे जाले |
दृष्टत्वेंसी गेले | दृश्य जेथ ॥
त्याच्या अस्तित्वास कसे ओळखावे ? ‘उत्तम पुरुषास’ त्याच्या या अवस्थेस प्राप्त झाल्याचे कसे जाणावे? बिंबे-प्रतिबिंबामधील ‘प्रभा’ दिसत नाही पण तिला नाही कसे म्हणता येईल? फुलामधील गंध नाकापर्यंत दरवळतो पण गंध दिसत नाही म्हणून नाकारता येईल काय? अगदी त्याप्रमाणे ‘उत्तम पुरुष’ आणि भगवंत यांच्यामधील ऐक्य भाव निर्माण झालेला असतो. जो ज्या संतांनी अनुभवला त्यामधील श्री जगत्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात -
देव पहायासी गेलो | तेथे देवची हावोनि ठेलो |
तुका म्हणे धन्य झालो | आजी विठ्ठला भेटलो ॥
अगदी ही आणि अशाच प्रकारची अनुभूती ‘माऊली’ आपल्या अभंगातून व्यक्त करताना दिसतात. भगवंत भेटीची अनुभूती श्री संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या अभंगातून व्यक्त करताना म्हणतात -
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती | रत्नकिळ फाकती प्रभा |
अगणित लावण्य तेजः पुंजाळले | न वर्णवे तेथिची शोभा |
या अभंगातील सर्व शब्द-न-शब्द अनुभवाच्या प्रचितीने व्यक्त झाले आहेत. उत्तम पुरुषाची ही सर्वश्रेष्ठ अवस्था संताना प्राप्त झालेली दिसून येते. भक्त आणि भगवंताचं हे आलिंगण अद्वैत स्वरूपाची प्रचिती देते. भगवत् स्वरूप झालेल्या भक्तांनी उत्तम पुरुषांची किंवा साक्षात परमेश्वराची महती फार सुंदर पद्धतीने माऊली मांडतात. पुरुषोत्तम; हा पुरुष पूर्णतेचा शेवट आहे. जो सर्वात श्रेष्ठ आहे, जिथे विश्रांतीही शांत झाली आहे. असे परमशांतीचं उत्तम पुरुष स्वरूप आहे.
पुरुषोत्तम किंवा उत्तम पुरुष म्हणजे-
1. सुखाला प्राप्त झालेले सुख, तेजाला सापडलेलं तेज.
2. त्याच्या ब्रह्मरूपी महाशुन्यात आकाशादी महाशुन्ये नाहीसे झाले आहेत.
3. जो सृष्टीकालात विश्वाएवढा विकसित झाल्यानंतरही उरला आहे.
4. जो विश्वाचा लय झाल्यानंतरही शिल्लक असतो.
5. जो पूर्ण स्वरूप आणि अनेकांपेक्षा एकमेवाद्वितीय आहे.
6. जो विश्व न होता विश्वाला धारण करतो.
7. ज्याच्या सत्तेने संपूर्ण जगत आहे आणि प्रकाशित होते.
8. जो विश्वाचा उत्पत्ती - स्थिती - लयास कारणीभूत आहे.
9. जगाच्या लयानंतरही ज्याला काही फरक पडत नाही. काळ-काम-वेग-प्रकाश-स्थिती-गती ज्याच्यामुळे चालते.
10. तो स्वयंप्रकाशित शिवाय सत्चिद्आनंद स्वरूप आहे.
जीवाच्या ठायी ज्ञानसूर्य प्रगट झाल्यानंतर जगाचे मिथ्यत्व समजते. अशाच साधकाकडून पुरुषोत्तम जाणला जातो. साधकास आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर संपूर्ण त्रिभूवन मिथ्या भासते. साधकास भगवंत स्वरूप ज्ञान प्राप्त झाल्यावर जगाचे मिथ्यत्व समजते. असा साधकाचे अंतःकरणात ज्ञानसूर्य उदय झाल्याने तो भगवंतास सत्यत्वाने जाणून मिथ्य अद्वैताला त्याने दूर सारलेले असते. एकूणच भगवंत यत्र-तत्र-सर्वत्र व्यापक असून तो सच्चिदानंदघन स्वरूप आहे. भेदाला त्याचे ठायी स्थान नाही, तो ऐक्याचे स्वरूप आहे, तो अश्याच भक्तांना आलिंगन देतो जे त्याची भगवत् स्वरूप होवोन सेवा, भजन करतात; किंबहुना जो भगवंत भक्त साम्य तत्त्वावर स्थिर होवोन विश्वाकडे पाहतो, ज्याच्या, ठायी विश्वाप्रतीच द्वैत शिल्लकच राहत नाही तोच भगवंताचे भजन करण्यास योग्य ज्याप्रमाणे आकाशाला आलिंगण देण्यात आकाशच योग्य !!!
म्हणोनि माझिया भजना| उचितु तोचि अर्जुना|
गगन जैसे आलिंगना| गगनाचिया॥
भजनाचे महत्त्व माऊली अधोरेखित करताना म्हणतात -
1. भजन करणारा भक्तीप्रमाणे ओतप्रोत भरलेला आणि भारलेला होवोन तो भगवंतस्वरूप झाल्याशिवाय भगवंतास प्राप्त होत नाही.
2. भगवंत भजन करतो त्याच्यात आणि भगवंतात भिन्नत्व नसते.
3. भगवंत हा भक्तीने ओतप्रोत भरलेल्या भक्तांचा दास असतो.
पंधराव्या अध्यायाचा समारोप माऊलींनी ‘भजन’ या भक्तीच्या अमोल मार्गाचे महत्त्व सांगत केलेला आहे. 2025 च्या आजच्या या शेवटच्या लेखाने ‘पुरुषोत्तम योग’ या पंधराव्या अध्यायास पूर्ण विराम घेत नवीन वर्षाचं स्वागत व जुन्या वर्षाचा निरोप घेऊ यात.
रामकृष्णहरी