डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या इराणी काबिल्यात राहणाऱ्या इराणी महिलेकडून तब्बल 4 लाख 40 हजार रूपये किंमतीचे मेफेड्रॉन नामक अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास वडवली भागातील निर्मल लाईफ स्टाईल गृहसंकुलकडे जाणाऱ्या रस्त्यावर केली. मानवी आरोग्याला घातक असलेल्या या गुंगी आणणाऱ्या पावडरचा साठा फातिमा तरबेज जाफरी (32) या महिलेकडून हस्तगत करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेली फातिमा आंबिवलीतील जिओ मार्टजवळ असलेल्या ग्रेट मदर इमारतीत राहते. आंबिवलीच्या इराणी काबिल्यात नेहमीच अंमली पदार्थांची तस्करी होते. त्यामुळे या भागात पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची सतत गस्त असते. या गस्तीमधून पोलिसांच्या जाळ्यात तस्कर अडकतात.
शुक्रवारी दुपारी अंमली पदार्थ विशेष कारवाई पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार राहूल शिंदे, अमित शिंदे, अनिल खरसाण हे पथक आंबिवली, वडवली, अटाळी परिसरात गस्त घालत होते. या पथकाकडून आंबिवली ते वडवली मार्गावर धावणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. इतक्यात त्यांना अनंता पेपर मिल परिसरात एक महिला संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आली.
गस्ती पथकाला पाहून त्या महिलेने धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने तिचा मनसुबा उधळून लावला. या महिलेकडील बॅगची झडती घेतली असता त्यात प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधलेली 22 ग्रॅम वजनाची मेफेड्रॉन पावडर आढळून आली. महिलेजवळील हा अंमली पदार्थ पाहून पथक चक्रावले. चौकशी दरम्यान आंबिवलीच्या इराणी काबिल्यात राहणाऱ्या या महिलेने स्वतःचे नाव फातिमा जाफरी असल्याचे सांगितले. आंबिवली परिसर अंमली पदार्थांचे तस्कर आणि गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जातो.
फातिमाच्या मागे रॅकेट असण्याची शक्यता
हस्तगत करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत 4 लाख 40 हजार रूपये इतकी आहे. पथकाने एमडी पावडरचा साठा जप्त करून तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याचे हवालदार राहुल शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार फातिमा जाफरी हिच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एमडी पावडरचा हा साठा तिने कुणाकडून आणला ? हा साठा कुणाला विक्री केला जाणार होता ? यापूर्वी तिने अशा गुन्ह्यात सक्रिय सहभाग घेतला होता का ? ही महिला अंमली पदार्थ तस्करांशी संबंधित आहे का ? तस्करीची वाहक आहे ? आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाने तपास चक्रांना वेग दिला आहे.