अंबरनाथ : अंबरनाथ मध्ये शिवसेना-भाजपाची मुख्य लढत असली तरी, या निवडणुकीत उबाठाची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपा दोन्ही पक्ष्यांमध्ये निवडणूक जिंकण्याची मोठी स्पर्धा सुरू असून शिवसेनेचे वाळेकर आणि करंजुले या दोन्ही दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आगामी दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवकपदासाठी एकूण 261 तर नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी शिवसेना, भाजपा यांची थेट लढत नगराध्यक्षपदासाठी असली तरी, उबाठाची मते निर्णायक ठरणार असल्याने शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर, आणि भारतीय जनता पार्टीच्या तेजश्री करंजुले-पाटील यांनी साम, दाम, दंड, भेद या उक्ती प्रमाणे कामाला लागले आहेत. तर उबाठा व मनसे युतीच्या उमेदवार अंजली राऊत या सय्यमाने आपला प्रचार करत आहेत.
मागील 2014 साली झालेल्या अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा दोघेही स्वतंत्र निवडणूक लढले होते. या निवडणुकीत डॉ. बालाजी किणीकर यांना 47 हजार मते तर भाजपाचे राजेश वानखेडे यांना 44 हजार 959 मते मिळाली होती.
यावेळी अवघ्या 2041 मतांनी डॉ. बालाजी किणीकर विजयी झाले होते. तर नुकत्याच 2024 रोजी झालेल्या अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत डॉ. बालाजी किणीकर यांना 1 लाख 11 हजार 368 मते मिळाली होती. तर उबाठाचे राजेश वानखेडे यांना 59 होणार 993 मते मिळाली होती. यावेळी डॉ. किणीकर 51 हजार 375 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती असताना देखील उबाठाला 59 हजार मते मिळाल्याने आता अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने उबाठाची नक्कीच निर्णायक भूमिका बाजावतील, असे जाणकरांचे मत आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
मनीषा वाळेकर -शिवसेना
तेजश्री करंजुले- पाटील - भाजपा
अंजली राऊत - उबाठा
नूतन पाटील - काँग्रेस
अश्विनी पाटील - राष्ट्रवादी (अजित पवार गट)
अंबरनाथमधील उमेदवार
शिवसेना : 58
भाजप : 54
काँग्रेस : 45
उबाठा, मनसे युती : 36
राष्ट्रवादी : 26
वंचित : 3
राष्ट्रवादी ( शरद पवार गट) : 5
अपक्ष : 34