Ambernath Shiv Mandir Pudhari
ठाणे

Ambernath Shiv Mandir: अंबरनाथ शिवमंदिर सुशोभीकरणासाठी उल्हासनगरमध्ये कारवाई; 30 पेक्षा अधिक घरे हटवली

138 कोटींच्या विकास प्रकल्पासाठी महापालिकेची मोहीम; रहिवाशांचा तीव्र विरोध, पोलिस बंदोबस्तात कारवाई पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर आणि अंबरनाथ सीमेवरील प्राचीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरण प्रकल्पासाठी अखेर शनिवारी सकाळी उल्हासनगर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली. कॅम्प 5 मधील एकता कॉलनी येथील एकता नगरमधील बाधित 30 पेक्षा अधिक घरांवर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने कारवाई करत ही बांधकामे निष्कासित केली. मात्र, या कारवाईदरम्यान रहिवाशांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता

सकाळी अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचे प्रमुख गणेश शिंपी आणि प्रभाग समिती 4 च्या सहाय्यक आयुक्त अलका पवार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक घटनास्थळी दाखल झाले. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी आपल्या घरांवरील या कारवाईला कडाडून विरोध केला. विशेषतः महिला आंदोलकांनी पोलिसांसमोर येत जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आणि कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली.

या कारवाईबाबत स्पष्टीकरण देताना सहाय्यक आयुक्त अलका पवार यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या आदेशानुसार शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पासाठी ही जागा शासनाच्या ताब्यात देणे आवश्यक होते. रहिवाशांना यापूर्वीच रीतसर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तांत्रिकदृष्ट्या ही जागा उल्हासनगरच्या हद्दीत असली तरी, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ती रिकामी करणे प्रशासकीय गरज होती.

सुशोभीकरणासाठी 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर

पिडीत नागरिकांनी अंबरनाथ येथील प्राचीन अंबरनाथ शिवमंदिर विकासासाठी सरकारकडून मोठा निधी मंजूर झाल्याचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला आहे. या सुमारे हजार वर्षांपूर्वीच्या मंदिराच्या परिसर सुशोभिकरणासाठी राज्य शासनाने सुमारे 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून मंदिर परिसराचा काशी विश्वनाथ धर्तीवर विकास करण्याची योजना आहे. या योजनेत मंदिर परिसराचे सुशोभिकरण, घाट बांधकाम, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, अँफीथिएटर, भक्तनिवास तसेच इतर सुविधा उभारण्याचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT