अंबरनाथ : 20 डिसेंबर रोजी पार पडलेल्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक बनिवडणुकीत 29 प्रभागात मतदान झाले. जवळपास 55 टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीत 17 माजी नगरसेवकांना पराभव पाहावा लागला. मतदारांनी अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे विजय मिळवण्याची खात्री असलेल्या मनीषा वाळेकर, सुवर्णा सुभाष साळुंखे, पन्ना वारींगे, निखिल वाळेकर, या सारख्या दिग्गज उमेदवाराना नाकारले. तर या निवडणुकीत 18 ब मधून शिवसेनेच्या उमेदवार अमृता मोहोरीकर यांना तब्बल 79.63 टक्के मतदान मिळाल्याने संपूर्ण 29 प्रभागातून त्यांना प्रथम क्रमांकाची मतं मिळाली आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीचा अभ्यास करता असे लक्षात येते की, मतदान केलेल्या एकूण मतदारांचा कौल नव्या पिढीला आहे. यात तेजश्री करंजुले पाटील, अभिजीत करंजुले, कुणाल भोईर, अपर्णा भोईर, स्वप्नील बागूल, अमृता अजय मोहोरीकर यासारख्या काही नव्या दमाच्या तरुण उमेदवारांना पसंती दिल्याचे दिसत आहे. त्याचसोबत मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केलेल्या नगरसेवक उमेदवारालाही मतदारांनी भरभरून मते दिली आहेत.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या या निवडणुकीत मतदान झालेल्या आकडेवारीचा आणि विजयी मतदारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहता, सर्वाधिक मतांचा टक्का मिळवण्याचा मान प्रभाग क्रमांक 18 ब मधून शिवसेना पक्षाच्या उमेदवार अमृता अजय मोहोरीकर यांच्याकडे जातो. त्यांच्या प्रभागात एकूण 3162 मतदारांनी मतदान केले.
त्यापैकी 2518 मतदारांनी आपली मते अमृता अजय मोहोरीकर यांना दिली तर फक्त 514 मते विरोधी उमेदवाराला मिळाली. नोटाची मते मिळून एकूण फक्त 634 मते त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे 79.63 टक्केवारीने अंबरनाथ निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविण्याचा मान त्यांच्याकडे जातो. विशेष म्हणजे अमृता अजय मोहोरीकर प्रथमच निवडणुकीत उतरल्या होत्या.
मतांची सर्वाधिक टक्केवारी दुसऱ्या क्रमांकावर रेश्मा गुडेकर
त्यानंतर अंबरनाथ निवडणुकीत मतांची सर्वाधिक टक्केवारी मिळवण्याच्या यादीत दूसरा क्रमांकावर आहेत शिवसेनेच्याच रेश्मा गुडेकर. प्रभाग क्रमांक 25 ब मधून रेश्मा गुडेकर लढत देत होत्या. या प्रभागात एकूण 3652 मतदारांनी मतदान केले आणि त्यापैकी 2894 मते रेश्मा गुडेकर यांच्या पारड्यात टाकली. यामुळे त्यांनी मिळवलेल्या मतांची टक्केवारी 79.24 इतकी भरते. त्यांच्या या विजयात त्यांचे दीर सचिन गुडेकर यांच्या मार्गदर्शनाचा आणि त्यांनी मागील कार्यकाळात केलेल्या कामाचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जाते.