Ambernath MIDC Issues
अंबरनाथ : आनंद नगर एमआयडीसी मधील कारखानदारांना आवश्यक सुविधा मिळवण्यासाठी झगडावे लागते. इतकेच नाही तर स्थानिक दलालांमुळे जागेचे भाव वाढून, बांधकामासाठी लागणारे साहित्य देखील माथी मारण्यासाठी दादागिरी व दहशत पसरवली जात असल्याने येथील कारखानदार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे येथील बहुतांश कंपन्या गुजरात व तेलंगणा येथे स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेत असल्याचा इशारा अंबरनाथ डिशनल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात आमा संघटनेने दिला आहे.
सोमवारी आमा संघटनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली. अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीत साधारण 1400 हून जास्त कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून 50 ते 60 हजार कोटी रुपयांची उलाढाल वर्षाकाठी होत असतानाही येथील कंपन्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यात राज्य शासन उदासीन असल्याने कारखानदार हवालदिल झाले आहेत.या अवस्थेची कामगार मंत्री व राज्य सरकार यामध्ये कोणतीही दखल घेत नसल्याने कारखानदार नाराजी व्यक्त करत आहेत.
सुविधांचा अभाव व दलालांचा प्रचंड त्रास यामुळे याआधी काही मोठ्या कंपन्या गुजरात व तेलंगणा येथे स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे 8 ते 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक परराज्यात गेली असल्याचे आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.