

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेमध्येच दोन ठेकेदारांमध्ये जबर मारहाण झाल्याने नगरपालिका फ्रिस्टाईलचा आखाडा बनले होते. पालिकेचे सुरक्षा रक्षक व पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे अंबरनाथ नगरपालिकेतील सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत लहान-मोठे कामाचे ठेके घेणारा ठेकेदार बॉस्को सुसाईनाथ आणि व्यंकटेश पिचिकरन या दोन ठेकेदारांमध्ये काम घेण्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीचे पर्यावसन गुरुवारी सायंकाळी हाणामारीत झाले.
पालिकेत फेरीवाला धोरण कमिटीच्या निवडणुका सुरू असताना त्याचवेळी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बॉस्को व व्यंकटेश व त्यांचे समर्थक एकमेकांना भिडले. यावेळी पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात नेले असून सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. या हाणामारीमुळे मात्र पालिकेतील सुरक्षा धोक्यात आली आहे.