अंबरनाथ : पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने झालेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गोंधळ पाहायला मिळाला. शनिवारी (20 डिसेंबर) सकाळच्या सत्रात अंबरनाथकरांनी मतदानाला दिलेल्या प्रतिसादामुळे सरासरी एकूण 53 टक्के इतके मतदान अंबरनाथमध्ये झाले. मतदानाच्या वेळेस अंबरनाथमध्ये 208 बोगस मतदार भिवंडीतून आणल्याच्या प्रकाराने येथे राजकीय राडा झाला. शिवसेना (शिंदे गट), भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांत वेगवेगळ्या कारणांवरून वाद झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस बळाचा वापर करावा लागला.
पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने झालेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काहीसा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. एकूण 29 वार्डातून 59 सदस्यांना निवडून द्यायचे होते. त्यासाठी 259 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तसेच थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मनीषा वाळेकर व भाजपच्या तेजश्री करंजुले-पाटील या दोघांमध्ये मुख्य लढत आहे. त्यात तब्बल 18 दिवस पुढे गेलेल्या निवडणुकीमुळे मतदानावर त्याचा परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र 20 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात अंबरनाथकरांनी मतदानाला दिलेल्या प्रतिसादामुळे दुपारी दीडपर्यंत 31.64 टक्के इतके मतदान झाले. तर एकूण 53 टक्के इतके मतदान अंबरनाथमध्ये झाले.
शहराच्या पश्चिम भागातील कोहोज गाव परिसरात शिवसेना उमेदवाराने प्रभाग क्रमांक दोन येथील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये बाहेरून आणलेले दोनशेपेक्षा जास्त बोगस मतदारांना ठेवले होते. भिवंडी व इतर शहरातून हे बोगस मतदार आणले होते. एकूण 208 जणांचा समावेश होता. यात लहान मुले वगळता 188 गैरकायद्याच्या मंडळींचे आधार कार्ड आणि इतर ओळखपत्राचे पुरावे पाहून त्यांची चौकशी दिवसभर पोलिसांकडून करण्यात आली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर व मतदानाची वेळ संपल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले.
दरम्यान, काँग्रेस उमेदवार प्रदीप पाटील यांनी हा बोगस मतदानाचा मोठा कट असल्याचा आरोप केला, तर शिवसेना शिंदे गटाचे कृष्णा पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले. आपल्या मॅरेज हॉलमध्ये लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची राहण्याची सोय नसल्याने ते तिथे थांबले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप कार्यकर्त्यांना पकडले
प्रभाग क्र. 28 मध्ये मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडून भरारी पथकाच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर शिवाजी नगर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप
प्रभाग क्र.5 मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिवसेना उमेदवार शैलेश भोईर आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केला आहे. या आरोपांनंतर कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला.
शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले
अंबरनाथमधील मातोश्रीनगर परिसरातही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले व त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले.