Ambernath Dowry Case Pudhari
ठाणे

Ambernath Dowry Case: 'हुंड्यासाठी' गेला नवविवाहितेचा बळी; आरोपी नवऱ्याला अटक

दीर आणि सासू फरार

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ: हुंड्यासाठी एका नवविवाहितेचा बळी गेल्याचा प्रकार अंबरनाथ च्या पालेगाव परिसरात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे तर दीर व सासू फरार असल्याचे पोलीस सांगतात. विशाखा (२८) असे या आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पुण्याच्या आनंदनगर परिसरात रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे अनिल शिंदे आज अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी उभे आहेत. दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न अंबरनाथच्या पालेगाव परिसरात राहणाऱ्या नितीन तीळकर याच्याशी मोठ्या थाटामाटात लावून दिलं होतं.

सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले मात्र त्यानंतर पेशाने डॉक्टर असलेल्या नितीनच्या डोक्यात 'हुंड्याचा' व्हायरस शिरला आणि त्यानं पैशांसाठी आपली पत्नी विशाखाचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. याच जाचाला कंटाळून विशाखाने मंगळवारी दुपारच्या सुमारास पालेगाव परिसरातल्या ओम साई रिजेन्सी इमारतीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

माहेरून पाच तोळे सोने आणि पैसे घेऊन ये असा तगादा नितीन आणि त्याच्या परिवाराने आमच्या मुलीकडे लावला होता आणि त्यातूनच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप विशाखाचे वडिल अनिल शिंदे यांनी केला आहे.

मयत विशाखाच्या वडिलांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी विशाखाचा पती नितीन, दीर निनाद आणि सासू छाया नामदेव तीळकर या तिघांच्या विरोधात शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये विशाखाचा पती आरोपी नितीन तीळकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर दीर आणि सासू फरार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT