ठाणे ः अनुपमा गुंडे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार तळागाळात पोहचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीच्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या लेखन आणि भाषणांचा खजिना 23 खंडांच्या रूपाने इंग्रजीत प्रकाशित करण्यात आला आहे. मात्र या खंडातील केवळ 8 च खंड मराठीत प्रकाशित झाले असून उर्वरित खंडांना अनुवादाची प्रतीक्षा आहे. हे खंड वेळेत अनुवादित करण्यासाठी मुदत संपुष्टात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समिती पुर्नरचनाही आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे.
देशाला भारतीय राज्य घटनेच्या रूपाने सशक्त लोकशाही देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनाकार नव्हते, तर डॉ. आंबेडकर हे अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक, पत्रकार, भाष्यकार, उच्चविद्याविभूषित होते. त्यामुळे विविध प्रांतात डॉ. आंबेडकरांनी विपुल लेखन केले आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीने 1976 पासून आजतागायत 23 खंड प्रकाशित केले आहेत. याशिवाय दलित चळवळीला दिशा देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या जनता या पाक्षिकावर 12 खंड प्रकाशित झाले आहेत.
डॉ. आंबेडकरांनी जगभर केलेल्या भाषणांचा आणि लेखनावर इंग्रजीत प्रकाशित झालेल्या 23 खंडांपैकी 2,4,6,9 आणि 13 याच खंडांचा मराठीत अनुवाद झाला आहे, तर 18.19.20 हे खंड मराठीतच प्रकाशित झाले आहेत. मात्र उर्वरित सर्व खंड मराठीत कधी प्रकाशित होणार हे गुलदस्त्यातच आहे. या समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जनता पाक्षिकावर 1ते 9 आणि जनता पाक्षिकांचा 1933 साली प्रकाशित झालेला विशेषांक असे 10 खंड प्रकाशित झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1976 मध्ये राज्य शासनाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन समितीची स्थापना केली. या समितीने प्रकाशित केलेल्या डॉ. आंबेडकरांच्या सर्व खंडांना अभ्यासक, संशोधक आणि विचारधारा मानणार्या वाचकांनी या खंडांना प्रतिसाद दिला. अनेक खंडांच्या आवृत्याही प्रकाशनानंतर तात्काळ संपतात, हा समितीचा अनुभव आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य विविध भाषांमध्ये प्रकाशित करून ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने स्थापन केलेल्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशन ला तत्कालीन राज्यशासनाने अर्थसाह्य दिले आहे.
डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला 2006 मध्ये 50 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांच्या प्रकाशित झालेल्या आधिकधिक खंडांचा मराठीत अनुवाद करण्याचा निर्धार तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला होता. मात्र या महामानवाच्या महानिर्वाणाला 70 वर्षे पूर्ण होत आली तरी त्यांचे समग्र कार्य मराठीत अनुवादित झालेले नाही. डॉ. आंबेडकराचे समग्र कार्य 20-25 खंडात प्रकाशित होईल, असा कयास होता, मात्र या लोकोत्तर महामानवाचे कार्याचा समग्र आढावा घेण्यासाठी सुमारे 50 खंड तरी प्रकाशित होतील, असा अंदाज यापूर्वीच या समितीतील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. मात्र या समितीला पुढे कधी मनुष्यबळाची तर कधी निधीची वाणवा असल्याने इंग्रजीतील साहित्याला मराठी अनुवादाची तर मराठीतील साहित्याला इंग्रजी अनुवादाची प्रतीक्षाच आहे.