अंबरनाथ : एकमेकांच्या विरोधात सार्वत्रिक निवडणूक लढलेल्या शिवसेना-भाजपाची निवडणुकीच्या पाच महिन्यानंतर देखील युती झाली नव्हती. अखेर दोन्ही पक्ष्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर गुरुवारी शिवसेना-भाजपा युतीवर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली.
देशात आणि राज्यात भाजपा-शिवसेनेची युती असताना अंबरनाथमध्ये मात्र युती होऊ शकली नव्हती. अनेकदा युतीची बोलणी होऊनही काही मुद्यांवर ही युती फिस्कटली होती. त्यामुळे पुनः ही युती होईल का? याबाबत शंका उपस्थित केली जात असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजपा पदाधिकारी यांची बुधवारी रात्री उशिरा मुंबई येथे बैठक पार पडली.
या बैठकीतच युतीची बोलणी यशस्वी झाली. यावेळी भाजपाचे नगरसेवक विश्वजित करंजुले, गट नेते अभिजित करंजुले, शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक अब्दुल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
युतीची घोषणा करण्यासाठी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब, प्रदेश सदस्य गुलाबराव करंजुले, शिवसेनेचे गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक अब्दुल शेख, गुणवंत खिरोडिया, श्रीनिवास वाल्मिकी उपस्थित होते.
अंबरनाथ नगरपालिकेची 20 डिसेंबर 2025 रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढल्याने युती होऊ शकली नव्हती. या निवडणुकीत शिवसेनेचे 27, भाजपा चे 14, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 4 आणि अपक्ष 2 असे एकूण 59 नगरसेवक निवडून आले. मात्र सत्ता समीकरण जुळवताना काँग्रेस चे नगरसेवक भाजपा मध्ये विलीन झाले. तर राष्ट्रवादी च्या चार नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.
त्यामुळे भाजपाचा नगराध्यक्ष असतानाही संख्याबळ शिवसेनेकडे जास्त होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेत सत्ता संघर्षाचा वाद उपाय येत होता त्यामुळे शहर विकासावर देखील त्याचा परिणाम दिसत होता अखेर शिवसेना आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीची बोलणी करून अंबरनाथ मध्ये युती जाहीर केल्याने सत्ता संघर्षाचा वाद आता मिटल्याने शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विरोधकांचे मनसुबे महायुतीने उधळले
भाजपा सोबत युती होऊ नये यासाठी शिवसेनेतील एक गट प्रयत्न करत होता. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी युतीला प्रतिसाद दिल्यानंतर या सगळ्याच विरोधकांचे मनसुबे उधळले गेल्याची चर्चा शहरात रंगली होती. त्यामुळे आता नगरपालिकेत शिवसेनेचे हे नगरसेवक कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.