अंबरनाथ : पोलीस भरतीत वारंवार येणाऱ्या अपयशाने एका तरुणीने आत्महत्येचे पाऊल उचल्याची घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे. प्रतीक्षा चंद्रशेखर राणे (26) असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्या मृत्यूमुळे जुना भेंडीपाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलातील भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करत होती. मात्र त्यात तिला वारंवार अपयश येत असल्याने ती मानसिक तणावाखाली होती. गुरुवारी तिने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत प्रतीक्षाने आई-वडिलांची माफी मागत आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत. सरकारी नोकरी मिळवू शकले नाही, पुढे काय करायचे हे समजत नाही. तुम्ही माझ्यावर कधीच दबाव टाकला नाही. पण मला स्वतःला काहीतरी करून दाखवायचे होते. 26 वर्षांची होऊनही कुटुंबासाठी काही करू शकले नाही, ही खंत मनात आहे, असे तिने पत्रात नमूद केले आहे. तिच्या मृत्यूमुळे जुना भेंडीपाडा परिसरात शोककळा पसरली आहे.