Ambarnath municipality  pudhari photo
ठाणे

Ambarnath municipality : शिवसेनेचाच गट जिल्हाधिकाऱ्यांनी वैध ठरवला

अंबरनाथमध्ये भाजपाला मोठा धक्का ; सात विषय समित्या शिवसेनेकडे येणार

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेतील शिवसेना आणि भाजपा प्रणित अंबरनाथ विकास आघाडी यांच्यातील सदस्य संख्येचा वाद अखेर मिटला असून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शिवसेनेचा गट वैध ठरवल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना- भाजपातील सदस्य संख्येचा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने जिल्हाधिकारी यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे आदेश दिले होते. त्यानंतर सदस्य संख्या बाबतचा वाद जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सुरू होता. या वादावर अखेर पडदा पडला असून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी 7 मे रोजी निकाल देऊन शिवसेनेचा गट वैध ठरवला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेतील एकूण 59 सदस्यांपैकी शिवसेनेचे 27, भाजपा 14, काँग्रेस 12, राष्ट्रवादी ( अप गट) 4 आणि अपक्ष 2 असे सदस्य निवडून आले आहेत. तर नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपाच्या तेजश्री करंजुले-पाटील शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत निवडून आल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी 30 सदस्य इतका आकडा आवश्यक असताना कोणत्याही पक्ष्याला बहुमत मिळाले नसल्याने व शिवसेना- भाजपा यांची युतीची बोलणी होऊनही ती फिस्कटल्याने भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादी व एक अपक्ष यांना सोबत घेऊन अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली व एकूण 31 सदस्यांचे पत्र सत्ता स्थापनेसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांना दिले होते.

मात्र या आघाडीतील राष्ट्रवादीचे चार सदस्य आघाडीतून बाहेर पडले व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेकडील 27, 1 अपक्ष व राष्ट्रवादी चे 4 असे 32 सदस्य झाल्याने त्यांनी देखील सत्ता स्थापनेचे 32 सदस्यांचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले. मात्र या विरोधात भाजपा ची अंबरनाथ विकास आघाडी न्यायालयात गेल्याने संख्याबळाचा वाद निर्माण झाला होता. या निर्णययावर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी निर्णय देऊन शिवसेनेचा गट वैध ठरवल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

आता पुढे काय?

संख्याबळाचा विषय जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित असल्याने मागील पाच महिन्यात अंबरनाथ नगर परिषदेत स्थायी समिती व इतर सात विषय समित्यांच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर देखील होत होता. परंतु जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शिवसेनेचा गट वैध ठरवल्याने स्थायी समिती आणि बांधकाम, पाणी पुरवठा, आरोग्य, महिला बालकल्याण, शिक्षण, नगर रचना, दलित वस्ती अश्या सात विषय समित्या शिवसेनेकडे येणार आहेत. यामुळे भाजपावर मात्र मोठी नामुष्की ओढवली असून नगराध्यक्ष जरी भाजपा चा असला तरी सत्ताकेंद्र मात्र शिवसेनेकडे राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT