Data Center Thane Pudhari
ठाणे

Data Center Thane: जगाने नाकारलेल्या डेटा सेंटरविरोधात शिवसेना रस्त्यावर

एमआरडीसीत नाही तर दरे गावात प्रकल्प उभारण्याची आदित्य ठाकरे यांची टीका

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: जलप्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी टंचाई, पाच लाखांच्या डिझेलच्या वापरामुळे निर्माण होणारी उष्णता आणि त्यातून जीवनमान उद्धवस्त होणार असल्याने अमेरिका, इंग्लड, युरोपसारख्याने देशाने हाकलून दिलेला एआय डेटा सेंटर हा ठाण्यातील बाळकूम येथे उभारण्यात येत आहे.

या २२ मजली प्रकल्पाविरोधात नागरिकांकडून तीव्र विरोध सुरु झाला आहे. त्या आंदोलनकर्त्या आणि बाधित होणाऱ्या नागरिकांच्या रस्त्यावरील आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पाठिंबा जाहीर करीत ॲमोझॉनचा हा डेटा सेंटर एमआयडीसीमधील रेड झोनमध्ये स्थलांतरीत करा अन्यथा उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या दरे या गावी उभारावा, अशी मागणी केली आहे.

ठाण्याच्या बाळकुम येथील भरवस्तीत पहिल्या टप्प्यात २२ मजली डेटा सेन्टर उभा राहत असून त्यातून २४ तास ९० ते ९५ डेसिबल आवाज येणार आहे. सुमारे ५१ एकर भूखंडावर दुसरा आणि भविष्यातील विस्तार होणार आहे. असा डेटा सेंटर शहराच्या मध्यभागी उभारण्याचे हे पहिले उदाहरण आहे.

जगाने नाकारलेला याप्रकल्पाला ठाणेकरांच्या करातून सवलती देण्यात आल्या आहेत. त्यांना केमिकल झोन उठवून मिळालेली जमीन देण्यात आली आहार. एवढेच नाही तर ठाणेकरांना पिण्यासाठी पाणी नसताना या डेटा सेंटरला लाखो लिटर पाणी पुरवला जाणार असल्याने ठाणेकर नाराज आहेत.

त्यातून वेक अप ठाणेकरांनी विरोध करण्यास सुरूवात केली असून शिवसेना उबाठाने पाठिंबा जाहीर केला आहे. त्या आंदोलनकर्त्यांची आज आदित्य ठाकरे यांनी भेट घेऊन या देत सेंटर विरोधात ठाणेकरांच्यासोबत राहताना न्यायालयात जनहित याचिका तसेच सभागृहात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले.

तसेच भाजपच्या आमदार संजय केळकर यांनी केलेला विरोध का मावळला? असा ही प्रश्न विचारत ठाकरे यांनी फक्त ठेकेदारांसाठी हा ४५ हजार कोटींचा प्रकल्प येत असून फक्त १५० जणांना नोकऱ्या मिळणार असल्याचा दावा केला आहे.

आता तुम्ही विरोध करीत असल्याने तुम्हाला अर्बन नक्षलवादी, विकासाच्या विरोधी असे ठिपके ठेवून आमिष दिले जातील, धमकावले जाईल, तरी ही मागे हटू नका, शिवसेना तुमच्या सोबत राहील असे आश्वासित करीत इतर पक्षांनाही या संदर्भात जाब विचारावा, असे आवाहन केले.

लढा अधिक तीव्र करणार

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो कशाला हवा असा प्रश्न उपस्थित करीत पंतप्रधानांच्या स्वप्नांसाठी नागरिकांची झोप का उडविता अशी टीका करीत नियोजन शून्य विकास सुरु असून फक्त ठेकेदारांच्या भल्यासाठी अंतर्गत मेट्रो आणि पॉड टॅक्सी प्रकल्प आहेत. मेट्रोच्या प्रकल्पाला १२ वर्ष होऊनही सुरु होऊ शकले नाही, आता साडेतीन हजार झाडे तोडून आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टीडीआर विकासकांना देण्याचा धंदा सत्ताधाऱ्यांनी सुरु केल्याचा आरोपही त्यांनी केला.

यापुढे या प्रकल्पाला तीव्र विरोध करावे, शिवसेना देखील नागरिकांसोबत राहील असे सांगत लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, जिल्हा उपप्रमुख सुनील पाटील यांच्यासह सेनेचे नेते आणि नागरिक उपस्थित होते.

सेंटरचा आवाज, वाढती उष्णता नागरिकांनी का सहन करावी?

ह्या डेटा सेंटरचा उपयोग ठाणे, महाराष्ट्र अथवा देशाला होणार नसून आपण फक्त डेटा गोळा करून त्याचा फायदा परदेशातील लोकांना होणार आहे. मोठ्याप्रमाणावर पाण्याचा वापर होणार असून पिण्यासाठी पाणी मिळणार नाही.

सिमेंट काँक्रीटमुळे अगोदरच गर्मी वाढली असताना या सेण्टरमुळे उष्णता आणखी वाढेल आणि आयुष्य बरबाद होणार आहे. त्यामुळे हा डेटा सेंटर रेड झोन असलेल्या एमआयडीसीमध्ये हलवा, ठाणे - कल्याणमध्ये नको अशी भूमिका घेत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन हेलिपॅड असलेल्या आपल्या दरे गावातील फार्म हाऊस उभारावे असा सल्ला दिला. आमचे सरकार आल्यावर हा प्रकल्प हद्दपार करू, असे ठाकरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT