डोंबिवली : फॅशनच्या दुनियेत सलमान खानसारखा दिसणारा शैलेश रामुगडे याने बॉम्बे टाईम्स फॅशन वीकपर्यंत मजल मारली होती. मात्र तरूणींना घायाळ करून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या या कथित मॉडेलरच्या नशिबी जेलवारी आली आहे. डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी या कथित मॉडेलरचा पुरता पिट्टा पाडला. पंचतारांकित हॉटेलांमध्ये जेवणावळी झोडणाऱ्या या पठ्ठ्याला पोलिसी कोठडीत मिळणाऱ्या भत्त्याच्या जेवणावर तब्बल दहा दिवस काढावे लागले. आता या पठ्ठ्याची रवानगी कल्याणच्या आधारवाडी तुरूंगात करण्यात आली आहे.
सलमान खानसारखा दिसणाऱ्या शैलेश रामुगडे याने मध्यंतरी बॉम्बे टाईम्स फॅशन वीकमध्ये प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. बॉलीवूडचा आयकॉन म्हणून ओळखला जाणारा सलमान खान सारखा आकर्षक डोपलगेंजर शैलेश रामुगडे याने बॉम्बे टाईम्स फॅशन वीकमध्ये पाऊल ठेवले. फॅशनच्या जगतात सलमान सारख्या दिसणाऱ्या या पठ्ठ्याने फक्त लक्ष वेधले नाही तर त्याने संपूर्ण शो कब्जात घेतला होता. शैलेश हा बाबा फाऊंडेशनचा संस्थापक असून त्याने म्हणे 78 मुलांना दत्तक घेतले आहे. शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्याने या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांना आधार दिल्याचे सांगण्यात येते.
बॉलिवूडमधील उदयोन्मुख प्रतिभा असलेल्या शैलेश प्रकाश रामुगडे याने अलीकडेच प्रसिद्ध छायाचित्रकार अमित खन्ना यांच्या कॅलेंडरमध्ये अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत काम केले. या अनपेक्षित आणि रोमांचक जोडीने मनोरंजन उद्योगात उत्सुकता आणि अपेक्षा निर्माण केल्या. अमित खन्ना हे एक प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत, जे त्यांच्या मनमोहक आणि कलात्मक छायाचित्रण कौशल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी शैलेश आणि उर्वशी यांच्यासोबत ग्लॅमर आणि कलात्मकतेचे मिश्रण करणाऱ्या एका अनोख्या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे. हा प्रकल्प त्यांच्या केमिस्ट्री आणि शैलीचे परिपूर्ण मिश्रण असल्याने प्रत्येक फ्रेममध्ये सिने जगताचे सार टिपतो.
वेगवेगळ्या भूमिका साकारण्यात बहुमुखी प्रतिभेसाठी ओळखली जाणारी अनुभवी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया सोबत शैलेश रामुगडे याने काम करून एक दृश्यदृष्ट्या आश्चर्यकारक आणि भावनिकदृष्ट्या प्रतिध्वनीत कॅलेंडर तयार केले आहे. उर्वशीचा अनुभव आणि शैलेशचा दृष्टिकोन यांचे मिश्रण कॅलेंडरसाठी केलेल्या शूटच्या माध्यमातून दिसून आले. अमित खन्नांच्या कॅलेंडरमधील शैलेश रामुगडे आणि उर्वशी ढोलकिया यांच्यातील मिश्रण बॉलिवूडकडे वाटचाल करणारे ठरले होते. फॅशनच्या दुनियेत सुपरस्टार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या पठ्ठ्याने प्रसिद्धीच्या वैभवात पाऊल टाकले. मात्र हीच पावले वाममार्गाकडे भरकटल्याचे त्याच्या बनवाबनवीच्या प्रकरणांतून दिसू लागली आहेत.
ठाण्यातील घोडबंदर रोडला असलेल्या हिरानंदानी इस्टेट गृहसंकुलात एकटाच राहणारा 30 वर्षांचा आरोपी शैलेश प्रकाश रामुगडे याचे आई/वडील मात्र दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी रोडला असलेल्या युगलक्ष्मी इमारतीत राहतात. शैलेशच्या विरोधात यापूर्वी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याचे 2 गुन्हे दाखल आहेत. ठाण्यात एक नामांकित ज्येष्ठ नगरसेवक राहतात. त्यांच्या नातीवर भुरळ पाडून या कथित मॉडेलर तथा रील स्टार शैलेश रामुगडेने तिलाही लुबाडले आहे. ठाणे पोलिस या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.
कर्मकांडांची कबुली
10 दिवस आरोपी शैलेश रामुगडे विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या कोठडीत होता. अकराव्या दिवशी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी या दहा दिवसांच्या कालावधीत पंचतारांकित हॉटेलांमध्ये जेवणावळी झोडणाऱ्या या पठ्ठ्याला पोलिसी भत्ता गिळावा लागला. ब्रेसलेट ऐवजी हाती बेड्या पडल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी चौकशीचा पिट्टा पाडला. या दहा दिवसांत त्याने आतापर्यंत केलेल्या कर्मकांडांची कबुली दिली. त्याच्याकडून 47 तोळे सोने, 4 महागडे आयफोन आणि 70 लाखांची आलिशान बीएमडब्ल्यू कार हस्तगत करण्यात आली.
6 तरुणींच्या पैशांवर ऐश
प्रेमजाळ्यात ओढून आत्तापर्यंत त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 6 तरूणींची फसवणूक केली आहे. फसलेल्या तरूणींकडून ओरबडलेल्या पैशांवर ऐश करणाऱ्या या पठ्ठ्याने विशेष म्हणजे 2 वेबसिरीज तयार केल्या आहेत. या वेबसिरीज जानेवारी 2026 मध्ये रिलीज होणार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. मॉडेलिंग करणाऱ्या या कथित रील स्टारने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरूणींना आपल्या जाळ्यात ओढले. मैत्रीनंतर प्रेमाचे नाटक करून तो फसवत आला आहे. ठाण्यातील एका नामांकित नगरसेवकाच्या नातीलाही फसवल्याची त्याने कबूली दिली आहे. आता याच कथित मॉडेलर तथा रील स्टारची रवानगी कल्याणच्या आधारवाडी तुरूंगात करण्यात आली आहे.