मिरा रोड: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीशी संबंध असलेला आणि आंतरराष्ट्रीय रेड नोटीस जारी झालेला कुख्यात आरोपी अख्तर मर्चंट अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मिरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखेच्या काशिमिरा पथकाने त्याला दिल्लीत बेड्या ठोकल्या.
खंडणीसाठी तक्रारदाराला फोनवरून धमकी दिल्याच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली. ट्रान्झिट रिमांड घेत त्याला मिरा-भाईंदरमध्ये आणले जात आहे. या अटकेमुळे महामुंबईतील संघटित गुन्हेगारीच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
नालासोपारा येथे वास्तव्यास असलेल्या अख्तर मर्चंटला खंडणीच्या प्रकरणात पूर्वी अटक झाली होती. आता त्याच्या अटकेमुळे १३ ऑक्टोबर २०२३ रोजी काशिमिरा परिसरातील इंटरनॅशनल बेकिंग शॉपमध्ये झालेल्या गोळीबाराच्या तपासालाही गती मिळणार आहे. तक्रारदार चंद्रकांत कोंडगुले यांच्यावर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पिस्तूल लॉक झाल्याने कोंडगुले थोडक्यात बचावले होते.
तपास चक्रे गतिमान होणार
पालघर, मुंबई आणि मिरा-भाईंदर पट्ट्यात अवैध गुटख्याच्या काळ्या बाजारावर वर्चस्व गाजवण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
यानंतर अख्तर मर्चंटसह निसार अहमद ऊर्फ पप्पू पेजर, अकबर अली, मुन्ना पठाण आणि इम्रान शेख यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्हा दाखल करण्यात आला.
या टोळीतील पप्पू पेजर याला यापूर्वीच मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. तो सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे. अख्तर मर्चंटच्या अटकेनंतर आता तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरणार आहेत.