वशिलेबाजीचे दिवस आता संपले आहेत : ना. अजितदादा पवार  File Photo
ठाणे

Ajit Pawar | वशिलेबाजीचे दिवस आता संपले आहेत : ना. अजितदादा पवार

मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा युवक कार्यालयाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड : ए आय चा जमाना आला असून, वशिलेबाजीचे दिवस आता संपले आहेत. कोण कोणत्या घरात जन्माला आला याला महत्व नसून बुध्दीमत्तेच्या जोरावर यश संपादन करता येते. त्यामुळे शिक्षणाला महत्त्व देऊन शासन शिक्षणावर हजारो कोटी खर्च करीत असते. असा सल्ल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा युवक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना देऊन यापूर्वी नोकर भरतीत वशिलेबाजी चालायाची याची एकप्रकारे कबुलीच अजितदादा यांनी दिली.

आज दसर्‍याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदुराव यांच्या जिल्हा युवक कार्यालयाचे ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते मुरबाड येथे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार दौलत दरोडा, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रवक्त्या श्रीमती पाटील, जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बोष्टे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

या नंतर कार्यकर्त्यांच्या झालेल्या मेळाव्यात अजितदादा यांनी आपल्या नेहमीच्या स्पष्ट वक्तव्यची परंपरा कायम ठेवत उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना वशीलेबाजीचे दिवस संपलेले असून ए आय चा जमाना सुरु झालेला आहे. बुध्दीमत्तेच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते. यासाठी शिक्षण महत्त्वाचे असून शासन हजारो कोटी रुपये खर्च शिक्षणावर करीत आहे.

या मेळाव्यास लाडक्या बहीणींची संख्या लक्षणीय होती. या बहीणीसाठी अजितदादा यांनी समाजात मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बचत गटाचे माध्यमातून शासन मदत करीत असून, महिला बचत गटांनी चांगल्या वस्तुंची निर्मीती केली तर त्याला मार्केट आहे. महीलासाठी राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत. ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात देखील पाणी विज निवारा या मूलभूत गरजा मिळायला हव्यात.ज्यांना घर जागा नाही , त्यांच्यासाठी पंतप्रधान अवास योजनेतून तीन कोटी घरे बांधली जाणार असून महाराष्ट्रात वीस लाख घरे बांधली जाणार आहेत. यासाठी अनेक अटी शिथिल केल्या आहेत. असेही ते म्हणाले.

पिण्याच्या पाण्याची योजना नसल्याची खंत

सुमारे 78 वर्षांपेक्षा जास्त काळ जाऊनही या आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची योजना नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याबाबत जिल्हा परिषदेचे सीइओ यांना संपर्क करणार असल्याचे ते भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले. ज्या घरांमध्ये पुराचे पाणी गेलय त्यांचे पंचनामे करून दिवाळी पूर्व नुकसानीचे पैसे अतिवृष्टी बधितांच्या खात्यात देणार असल्याचे सुध्दा ते म्हणाले. यासाठी केंद्राचा निधी मागतोय, राज्यातून निधी देतोय, शिवाय दानशूर लोकांना मदतीसाठी आवाहन करून चांगल्या पगारी लोकांकडून एक दिवसाचा पगार ही मागतोय, असा सुरू असलेला प्रयत्न त्यांनी मांडला.

कामे पाठपुरावा केल्याशिवाय होत नाहीत

कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी सूचना केल्या नंतर भाषणा दरम्यान शांतारामभाऊ घोलप यांचे स्मरण करायचे ते विसरले नाही. तर आळस झटकून सकाळी लवकर उठून कामाला लागावे, असा उपदेश कार्यकर्त्यांना केला. सरकार जिल्ह्याच्या ठिकाणी एक मेडिकल कॉलेज, एक नर्सिंग कॉलेज देतेेय तसेच बंद एमआयडीसीबाबत उल्लेख करून त्या बंद पडण्याची कारणे शोधण्याचा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. मुरबाड तालुक्यातील कमी प्रमाणात असलेल्या विजेचा कमी प्रवाह सुरळीत होण्यासाठी स्वतंत्र सब स्टेशनचा पर्याय सुचविला. तर ही कामे पाठपुरावा केल्याशिवाय होत नसल्याचे सूचक विधान कार्यकर्त्यांसमोर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT