

मुंबई : अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी अद्याप विकासक निश्चित झाला नसला तरी येथील रहिवाशांना 620 चौरस फुटांपेक्षा मोठे घर मिळणार हे निश्चित झाले आहे. सध्या दोन विकासकांच्या निविदा पडताळणीचे काम सुरू आहे.
अभ्युदयनगर प्रकल्पासाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 635 चौरस फूट असण्याबद्दल प्रमुख अट होती. मात्र, विकासकांकडून ही अट व्यवहार्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निविदेमध्ये पुनर्वसन सदनिकेचे चटईक्षेत्र 635 चौरस फूटऐवजी किमान 620 चौरस फूट ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच निविदेमध्ये 620 चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ देणार्या विकासकाचा विचार पुनर्विकासासाठी करण्याचे निर्देश दिले.
सुधारित निविदा 29 मे रोजी काढण्यात आली. त्यानंतरही अनेकदा मुदतवाढ द्यावी लागली. लोकसंख्येची घनता अधिक असल्याने विकासकांना हा प्रकल्प व्यवहार्य वाटत नव्हता. मात्र अखेर त्यांनी निविदा भरल्या आहेत. एमजीएन अॅग्रो, एनएमपी बिल्डकॉन आणि ऑनेस्ट शेल्टर्स यांनी संयुक्तरित्या निविदा भरली असून महिंद्रा आणि ओबेरॉय यांनी स्वतंत्रपणे निविदा भरल्या होत्या. मात्र यात महिंद्राची निविदा तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरली. परिणामी, दोनच निविदा स्पर्धेत आहेत. या दोन्ही निविदांमध्ये 620 चौरस फुटांपेक्षा मोठे घर देण्यात आले आहे.
अभ्युदयनगरमध्ये 15 हजार रहिवासी वास्तव्यास आहेत. 1 लाख 33 हजार 593 चौरस मीटर जागेत 48 इमारती आहेत. 208 चौरस फूट आकारमानाच्या 3 हजार 420 सदनिका आहेत.